
डहाणू नगरपरिषदेने अतिक्रमण हटवले
डहाणू, ता. १ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद हद्दीतील सरावली शिवाजीनगर येथील हरित पट्ट्यात असणाऱ्या आदिवासींच्या जमिनीवर बांधण्यात आलेली १० पक्की घरे पाडण्यात आली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. डहाणू शहरातील सरावली शिवाजीनगर येथील हरित पट्ट्यातील आदिवासींच्या जमिनीवर मुंबई येथील एका बड्या व्यक्तीने पक्की घरे बांधून ती गरजू लाभार्थ्यांना ९९ वर्षांच्या कराराने विक्री केली होती. ही जमीन हरित पट्ट्यात असून ती आदिवासींच्या मालकीची असल्याच्या तक्रारी डहाणू नगर परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे तेथील सर्व घरमालकांना नगर परिषदेने नोटिसा बजावल्या होत्या; मात्र या नोटिसांना घरमालकांनी दाद दिली नव्हती. अखेर २७ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी पोलिस बंदोबस्तात आणि फौजफाट्यासह जाऊन दोन जेसीबीच्या साह्याने १० पक्की घरे पाडून जमीन मोकळी करण्यात आली.