
बोर्डी स्मशानभूमीची आमदारांकडून पाहणी
बोर्डी, ता. २८ (बातमीदार) : डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी बोर्डी येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाची पाहणी केली. यावेळी नूतनीकरण समितीचे अध्यक्ष किरण राऊत आणि समिती सदस्य उपस्थित होते. बोर्डी येथील समुद्रकिनारी असलेली स्मशानभूमीच्या वास्तूची दुरावस्था झाल्याने बोर्डी गावातील तरुणांनी एक समिती स्थापन केली असून लोकवर्गणीतून वास्तूचे नूतनीकरण तसेच वास्तूला समुद्राच्या भरतीचा धोका पोहोचू नये म्हणून सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी गावातील अनेक दानशूर लोकांनी देणगी दिली दिली आहे. तसेच गावातील एक प्रतीत यश उद्योजक प्रभाकर राऊत यांनी एक लोखंडी भट्टी दिली आहे. हे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी ग्रामपंचायतीच्या निधीतूनही खर्च करण्यात येणार आहे. तसेच आमदार निधीतून मदत करण्यात यावी या हेतूने समितीच्या सदस्यांनी आमदार निकोले यांना विनंती केली होती. या विनंतीचा मान ठेवून त्यांनी नुकतीच स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा आढावा घेत समितीच्या सदस्यांशी संवाद साधला.