
बेस्ट कर्मचाऱ्यांची फसवणूक; कंपनीविरोधात गुन्ह्याची नोंद
मुंबई, ता. २८ : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे, भविष्य निर्वाह निधी हडप केल्याप्रकरणी एम. पी. एंटरप्राईस या कंपनीविरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एम.पी. एंटरप्राईस ही कंपनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट
संबंधित कंपनीविरोधात बेस्ट कर्मचारी ऋषिकेश कदम यांनी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले, की
एम. पी. एंटरप्राईस ही मूळ कंत्राटदार कंपनी होती. मे २०२१ ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत ह्युमनिक कंपनीकडून आमचे वेतन वेळेवर होत असे. त्याची स्लीपही माझ्याकडे आहे. त्यानंतर ह्युमनिक कंपनीचे काम अचानक बंद होऊन आमच्या वेतनाचा सर्व कारभार मूळ कंपनीने ताब्यात घेतला. डिसेंबर २०२१ पासून माझा नमूद काळातील भविष्य निर्वाह निधी व ईएसआयसी माझ्या वेतनातून कापून घेतला जात होता; परंतु मला पगाराची स्लीप मिळत नव्हती. त्यानंतर ‘यूएएन’ क्रमांकाने भविष्य निर्वाह निधीबाबत पडताळणी केली असता संबंधित कंपनीकडून त्याचा भरणा होत नसल्याचे निदर्शनास आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.