श्वान निर्बिजीकरण प्रश्न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वान निर्बिजीकरण प्रश्न ऐरणीवर
श्वान निर्बिजीकरण प्रश्न ऐरणीवर

श्वान निर्बिजीकरण प्रश्न ऐरणीवर

sakal_logo
By

विरार, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत जवळपास ५० हजारांहून कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका स्थापन होऊन तेरा वर्षे होत आली असली तरी महापालिका श्वान निर्बिजीकरण केंद्र तयार करण्यात अयशस्वी ठरली आहे. पालिकेच्या हद्दीत दोन जागा श्वान निर्बिजीकरण केंद्रासाठी नियोजित असल्या तरी या ठिकाणी ती केंद्रे चालवण्यासाठी ठेकेदार येत नसल्याने श्वान निर्बिजीकरण प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून पालिका हद्दीतील श्वानांचे निर्बिजीकरण व रेबीज लसणीकरण करण्यात येत असते. महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपालिकेने श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारले होते. महापालिका झाल्यानंतर ते केंद्र महापालिकेत समाविष्ट झाले; परंतु महानगरपालिका झाल्यावर एकही केंद्र पालिका प्रशासनाला उभारता आले नाही. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्याचा ठराव करण्यात आला होता. सुरुवातीला जागा नसल्याचे कारण पुढे आले होते; आता २ ठाकिणी जागा उपलब्ध झाल्यापासून त्यासाठी टेंडर काढण्यात आले असले तरी त्याला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नसल्याने पालिका प्रश्न ठेकेदाराच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र याठिकाणी निर्माण झाले आहे.

------------------
कुत्र्यांना आवरण्याची मागणी
पालिका क्षेत्रात असलेल्या एकमेव श्वान निर्बिजीकरण केंद्राचे काम मे. युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर ही संस्था करत होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे केंद्रही बंद पडले आहे. शहरात कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिक पालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांना आवरण्याची मागणी करत आहेत. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

===============
पालिका हद्दीत श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पालिका हद्दीत त्यासाठी आम्ही दोन जागाही नियोजित केल्या आहेत. तसेच निविदाही काढली आहे; परंतु केंद्र चालवण्यासाठी अजून कोणी ठेकेदार मिळालेला नाही. आम्ही ठेकेदार मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. चांगला ठेकेदार मिळाल्यास प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका