ठाण्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त

ठाण्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अशातच पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत असून वाहतूक कोंडीत भर पडत असते. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याबरोबरच पालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर विद्युत तसेच इंटरनेट वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या चरी बुजवण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्या असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे महापलिका क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी व डागडुजीसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधीदेखील देण्यात आला आहे. त्यानुसार ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून ही कामे सुरू आहेत. शहरातील काही रस्ते सुस्थितीत असले तरी त्यावर विद्युत किंवा इंटरनेट वाहिन्या टाकण्यासाठी चरी खोदण्यात आलेल्या आहेत. यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. विद्युत किंवा इंटरनेट वाहिन्या टाकण्यासाठी चरी खोदण्यासाठी पालिका संबंधित विभागांना परवानगी देते आणि तेथील रस्तेदुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडून शुल्कही आकारते. दरवर्षी या शुल्कापोटी पालिकेच्या तिजोरीत अंदाजे ५० कोटी रुपये जमा होतात. यंदा २९ कोटी रुपये जमा झालेले असून महिनाभरात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
------------------------
६ मार्चपर्यंत निविदा भरण्याची मुदत
दरवर्षी चर खोदाई शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून चर बुजवण्याची कामे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येतात. यंदाही पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अशाच प्रकारची कामे हाती घेतली आहेत. या कामासाठी पालिकेने निविदा काढल्या असून या कामासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामासाठी ६ मार्चपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

---------------------
या ठिकाणची होणार कामे
ठाणे महापालिका क्षेत्रातील माजिवाडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकर, कळवा, उथळसर, वागळे इस्टेट, नौपाडा-कोपरी, मुंब्रा आणि दिवा या नऊ प्रभाग समिती क्षेत्रातील रस्त्यांवर विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरी बुजवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com