दुचाकीस्वाराची गर्भवती महिला व दोन वर्षाच्या मुलीला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीस्वाराची गर्भवती महिला व दोन वर्षाच्या मुलीला धडक
दुचाकीस्वाराची गर्भवती महिला व दोन वर्षाच्या मुलीला धडक

दुचाकीस्वाराची गर्भवती महिला व दोन वर्षाच्या मुलीला धडक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण पश्चिमेतील गांधारे परिसरात मुंबई विद्यापीठाजवळ एका तरुणाने भरधाव वेगाने दुचाकी चालवत एक गर्भवती महिला व तिच्या दोन वर्षांच्या मुलीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात गर्भवती महिलेस त्रास सुरू झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेला उपचारासाठी मदत करण्यास गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाच्या मित्राला महिलेच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
कल्याण येथे राहणाऱ्या स्वाती पवार (वय २८) या मंगळवारी दुपारी आपल्या लहान मुलीसह अग्रेसन चौकातून पायी चालल्या होत्या. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या विवेक साबळे (वय १९) याच्या दुचाकीची धडक स्वाती व त्यांच्या मुलीला बसली. यात मुलीच्या पायाला दुखापत झाली, तर स्वाती यांना देखील त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्वाती यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात विवेक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विवेक याचा मित्र दाशिल गोसर (वय २६) याने स्वाती यांचे नातेवाईक सुरेश पवार व मोहीत पवार यांनी मारहाण केल्याची तक्रार खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करत आहेत.