राज्यभरातील ४८ मोर्च्यांची आझाद मैदानावर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यभरातील ४८ मोर्च्यांची आझाद मैदानावर धडक
राज्यभरातील ४८ मोर्च्यांची आझाद मैदानावर धडक

राज्यभरातील ४८ मोर्च्यांची आझाद मैदानावर धडक

sakal_logo
By

धरणे, निदर्शने आणि अन्नत्याग!
राज्यभरातील सामाजिक संघटनांचे आझाद मैदानात आंदोलनास्त्र
किंवा
आझाद मैदानात आंदोलनास्त्र!
अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील सामाजिक संघटनांची धडक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : विधिमंडळ अधिवेशन आणि आझाद मैदानातील आंदोलन यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतील अधिवेशनादरम्यान राज्यभरातून अनेक संघटना वा पीडित व्यक्ती न्यायाच्या अपेक्षेने मुंबईतील आझाद मैदानात दाखल होतात. आंदोलने, धरणे, उपोषण, अन्नत्याग आणि मूक निदर्शनांच्या माध्यमातून आपले गाऱ्हाणे सरकारदरबारी मांडत असतात. आताही मुंबईत सुरू झालेल्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आझाद मैदानावर राज्यभरातील सामाजिक संघटना आणि पीडित कुटुंबीयांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यभरातून आलेले तब्बल ४८ आंदोलक सध्या विविध मागण्यांसाठी मैदानात तळ ठोकून आहेत.
मराठा आरक्षण मोर्चा, माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, नरिमन पॉइंट परिसरातील महात्मा फुले नगर झोपडपट्टी रहिवासी संघ, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशन, न्यायालयातील कनिष्ठ लिपिक शिपाई आणि लघुलेखक भरती प्रक्रियेतील उमेदवार, संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना इत्यादींनी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने हजेरी लावली आहे.
माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. आयोगाच्या सर्व कार्यालयांमध्ये आज एकूण एक लाखापेक्षा जास्त अपील प्रलंबित आहेत. अपीलांवर सुनावणी होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा विलंब लागत आहे. त्यामुळे जागरूक नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळू लागला आहे. साहजिकच माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर आंदोलनाला बसले आहेत.
महाविद्यालयांना अनुदान मिळावे, अशी मागणी करत प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशन आंदोलन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आदी छात्रवृत्तीअंतर्गत सर्व पात्र ८६१ विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशिप मंजूर करण्याच्या आणि निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ अवॉर्ड लेटर देण्याच्या मागणीसाठी पीडित उमेदवारांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतिबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी आझाद मैदानावर १ मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील हजारो संगणक परिचालक आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.
-----------
घरांसाठी आंदोलन
नरिमन पॉइंट परिसरातील महात्मा फुले नगर झोपडपट्टीत २००४ ते २०१४ पर्यंत राहणाऱ्या रहिवाशांच्या १५० झोपडपट्ट्या पाडून २०१५ नंतर त्यांना बेघर करण्यात आले होते. त्यानंतर हक्काचे घर मिळावे यासाठी संबंधित विभाग आणि शासनदरबारी निवेदन देण्यात आले; मात्र कोणतीच कार्यवाही न झाल्याने बेघरांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
---
आंदोलन कशासाठी?
आझाद मैदानात आपले विविध प्रश्न घेऊन दाखल झालेले आंदोलक उन्हाची पर्वा न करता शासनदरबारी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. उपोषण, अन्नत्याग, आंदोलन, धरणे, निदर्शने, निवेदन इत्यादी विविध मार्ग त्यांनी पत्करले आहेत. कोण भ्रष्टाचाराशी लढा देत आहे, तर कोणी आश्रमशाळेच्या शिक्षकांना पगार मिळावा म्हणून मैदानात उतरले आहे. शेतातून रेल्वेमार्ग आणि रस्ता गेल्याने कोणाला त्याची भरपाई हवी आहे; तर शाळेवरील कारवाईसाठी कोणी निवेदन देत आहे. महाविद्यालयीन अनुदान, सार्वजनिक बांधकाम खात्याची चौकशी, पोलिसांकडून होत असलेला अन्याय, शेजाऱ्याचा त्रास, बलात्कारप्रकरणी चौकशी, रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार, पेन्शन, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण इत्यादी अनेक मुद्दे घेऊन आंदोलनकर्ते आझाद मैदानात जमले आहेत.