गावठाण जमिनीचा २० हजार जणांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठाण जमिनीचा २० हजार जणांना लाभ
गावठाण जमिनीचा २० हजार जणांना लाभ

गावठाण जमिनीचा २० हजार जणांना लाभ

sakal_logo
By

शहापूर, ता. २ (बातमीदार) : भूमी अभिलेख विभागाकडून तालुक्यातील गावठाण जमिनींचे ड्रोनद्वारे केलेल्या सर्वेक्षणानंतर भूमापन केलेल्या मिळकतीचा जमीनधारकांना सनद वाटप करण्याचा कार्यक्रम उंभ्रई येथे पार पडला. या वेळी २१ जमीनधारकांना सनद वाटप करण्यात आली. यामुळे गावठाण जमीन आता संबंधित धारकाच्या मालकीहक्काची झाली आहे. तालुक्यातील तब्बल १९६ गावांतील गावठाण जमिनीवरील सुमारे २० हजार धारकांना टप्प्याटप्प्याने सनद वाटप करण्यात येणार आहे.
या वेळी शहापूरच्या भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र लोंढे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, भूकरमापक प्रतीक जगे, तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. या सनदमध्ये नगर भूमापन क्रमांक, धारकाचे नाव, मिळकतीचे क्षेत्र व नकाशा समाविष्ट करण्यात आला आहे. तालुक्यातील १९६ गावांतील गावठाण जमिनीवरील धारकांना टप्प्याटप्प्याने सनद वाटप करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक राजेंद्र लोंढे यांनी सांगितले. यामुळे संबंधित जमिनीचे कायदेशीर हस्तांतरण, वारसनोंदी, बांधकाम परवानगी आदी कामे होणार आहेत; तर या योजनेतील भूसंदर्भीय नकाशांमुळे पुढील नियोजनासाठी शासनाला व ग्रामपंचायतींना फायदा होणार आहे.

---------------------
२१ मिळकतधारकांना सनद वाटप
भूमी अभिलेख विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण जमिनीचे जियोग्राफीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणालीद्वारे शहापूर तालुक्यातील १९६ गावांतील गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर भूमापन केलेल्या गावठाण मिळकतींवरील धारक घोषित करण्यात आले. संबंधित धारकांना गावठाण जमिनीचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून सनद वाटप करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील उंभ्रई येथे २१ मिळकत धारकांना सनद वाटप करण्यात आली.