पनवेलकरांच्या खिशाला कात्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलकरांच्या खिशाला कात्री
पनवेलकरांच्या खिशाला कात्री

पनवेलकरांच्या खिशाला कात्री

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २ (वार्ताहर)ः नेहमी गजबजलेल्या पनवेल रेल्वेस्थानकात पार्किंगचा मुद्दा कायम ऐरणीवर येत आहे. या ठिकाणी सिडकोसह रेल्वेचे पाच वाहनतळ आहेत. मात्र, रेल्वेच्या वाहन तळावरील शुल्क अरेरावी पद्धतीने वाढवण्यात आल्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
पनवेल रेल्वेस्थानक ‘अ’ दर्जाचे असून लवकरच या ठिकाणी जंक्शन होणार आहे. पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, सुकापूर, आदई, आकुर्ली, विचुंबे, नेरे या ठिकाणांहून मुंबई वा अन्यत्र नोकरी-व्यवसायासाठी जाणारे चाकरमानी पनवेल स्थानकातून रेल्वेने जातात. त्यासाठी रेल्वेस्थानकापर्यंत आपल्या वाहनाने येऊन स्टेशनजवळ वाहन पार्क करून उपनगरीय रेल्वेचा वापर करतात. मात्र, येथे चार वाहनतळ असूनही पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने सकाळी ९ वाजेपर्यंत पार्किंग फुल होऊन जाते. बाजूला सिडकोनेही पार्किंगची सोय केली आहे. मात्र, तेथे दर कमी असल्याने वादावादीचे प्रकार घडत आहेत; तर रेल्वे पार्किंगमध्ये मनमानी पद्धतीने पैसे वसुली केली जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
----------------------------------------------------
पार्किंगचे शुल्क डी साईट (वाढीव )
दोन तास- सायकल ५ , मोटरसायकल १० रुपये, कार २० रुपये.
सहा तास- सायकल १० रुपये, मोटरसायकल २० रुपये, कार ४० रुपये.
मध्यरात्रीपर्यंत - सायकल २० रुपये, मोटरसायकल ४० रुपये, कार १०० रुपये.
मासिक पास - सायकल ३०० रुपये, मोटरसायकल ६०० रुपये, कार १००० रुपये.
हेल्मेट- ५ रुपये प्रति दिन
-------------------------------------
पार्किंगचे शुल्क - ई साईट
दोन तास - सायकल १ रुपया, मोटरसायकल ५ रुपये, कार १० रुपये.
सहा तास - सायकल २ रुपये, मोटरसायकल १० रुपये, कार २५ रुपये.
मध्यरात्रीपर्यंत- सायकल ५ रुपये, मोटरसायकल २० रुपये, कार ५० रुपये.
मासिक पास - सायकल ० रुपये, मोटरसायकल ३०० रुपये, कार ६२५ रुपये.
हेल्मेट- २ रुपये प्रतिदिन
--------------------------------------
पार्किंगचे शुल्क सिडको
बारा तास - सायकल १ रुपया, मोटरसायकल ८ रुपये, कार १० रुपये.
----------------------------
हेल्मेटसाठी सक्तीचे भाडे
शासनाने हेल्मेटसक्ती केली आहे; परंतु पनवेल रेल्वेस्थानकावर वाहनतळावर हेल्मेट भाडे आकारले जात आहे. रेल्वेच्या दोन्ही वाहनतळांवर हेल्मेटचे भाडे घेतले जात आहे. त्यामुळे बाजारात सर्वसाधारणपणे पाचशे ते हजार रुपयांपर्यंत उच्च प्रतीच्या हेल्मेटसाठी पार्किंगसोबत मासिक भाडे द्यावे लागत असल्यामुळे हेल्मेटच्या किमतीपेक्षाही जास्त भाड्याचा भुर्दंड बसत आहे.
-------------------------------------------
रेल्वेच्या दोन्ही वाहनतळापेक्षा सिडकोच्या वाहनतळाचे भाडे अगदी नगण्य आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांची वाहने पार्क करण्यासाठी स्पर्धा होत आहे. परिणामी, सकाळी लवकरच सिडकोचे वाहनतळ फुल होत असल्यामुळे दुपारी येणाऱ्या वाहनचालकांनी गेटवर वादावादी होते.
- विनायक खुटले, प्रवासी
---------------------------------------
रेल्वेचे येथे पाच वाहनतळ आहेत; परंतु त्यातील तीन चालू आहेत. त्यापैकी एका वाहनतळाच्या ठेक्याचे नूतनीकरण झाले असून त्याचे दर वाढलेले आहेत. दुसऱ्या वाहन तळाचा ठेक्याचा कालावधी संपल्यानंतर त्याचेही नवीन वाढीव दराने नूतनीकरण होणार आहे.
- सुधीर कुमार, रेल्वे प्रबंधक, वाणिज्य विभाग