
होळीच्या पार्श्वभूमिवर मद्यविक्रिवर अंकूश
जव्हार/मनोर, ता. २ (बातमीदार) : होळीच्या पार्श्वभूमिवर दमण भागातून होणाऱ्या अवैध मद्यतस्करीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सीमावर्ती भागात नाकाबंदी, संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच इतर भागातही अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही दिवसांत जव्हार, तलासरीह कासा भागात कारवाई करत मोठा मद्यसाठी ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे मद्यतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी (ता. १) सायंकाळी तलासरी तालुक्यात केलेल्या कारवाईत दमण बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. खानवेल-उधवा रस्त्यावरील उधवा पोलिस चौकीसमोर ही कारवाई करण्यात आली आहे. दमण बनावटीचे विदेशी मद्य व बियरचा सुमारे अठ्ठेचाळीस लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी अवैध, नकली आणि परराज्यातील दारू तस्करी विरोधात कारवाईचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सायंकाळी तलासरी तालुक्यातील खानवेल-उधवा रस्त्यावर दमण बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. कोकण विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक आनंदा कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उधवा पोलिस चौकीसमोर पाळत सापळा रचला होता. ही कारवाई कोकण विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे, जवान नारायण जानकर, केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, वैभव वामन आणि जी. के. खंडागळे यांनी केली आहे.
------------------------
टेम्पोसह ४०० बॉक्स ताब्यात
टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या दमण बनावटीचे बनावटीचे विदेशी मद्याचे ३३० बॉक्स आणि बियरचे ७० बॉक्स आढळून आले. टेम्पोचालक सुरेशकुमार दयाराम यादव आणि शैलेश मोहनभाई वर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात मुंबई मद्य निषेध कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दमण बनावटीच्या मद्य वाहतुकीसाठी वापरलेल्या टेम्पोसह महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या दमण बनावटीच्या दारूचे ४०० बॉक्स, लाकडी भुशाच्या २०० गोण्या, दोन मोबाईल असा ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जव्हार तालुक्यानजीक गुजरात राज्याची सीमा आहे. त्यामुळे या भागात अनेकदा बनावट दारू जव्हार तालुक्याच्या हद्दीतून नेण्यात येत असते. मंगळवारी रात्री नाशिक-संगमनेर येथील दोघेजण सिल्वासा दमण येथील दारू चोरट्या पद्धतीने घेऊन जात होते. खंबाळा दुरक्षेत्राजवळील नाकाबंदी दरम्यान जव्हार पोलिसांनी एका जोडप्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
जव्हार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री खंबाळा दुरक्षेत्र येथील नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी गाडीतून दमण बनावटीची दारू घेऊन जात असताना पोलिसांना संशय आला. त्यावेळी नाकाबंदी पोलिसांनी गाडी अडवून विचारणा केली; मात्र मद्य वाहतूक करणारे दोघे जण पोलिसांनाच उलट प्रश्न विचारत होते. पोलिसांचे ओळखपत्र दाखवण्यासाठी हुज्जत घातली. पोलिसांनी अधिक तपासणी केली असता दमण बनवटीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत दमण बनावटीचा तीन लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जव्हार पोलिसांच्या टीमने अवैध दमण दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ सीलबंद बाटल्या, मद्याचे नऊ बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. पुढील तपास डी. एम. पाटील करीत आहेत.