
दोन दिवसाआड मुरबाडमध्ये पाणी
मुरबाड, ता. २ (बातमीदार) : मुरबाड शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिकच बिकट झाले असून, आता शहरामध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षांनी ४ मार्चपासून दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिरवली धरणाची लघु पाटबंधारे विभागामार्फत मार्च महिन्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा व भविष्यात येणारी पाणीटंचाई याचा विचार करून दर दोन दिवसांनी पाणी पुरविले जाणार आहे. नागरिकांनी आवश्यकतेप्रमाणे पिण्याचे पाणी साठवून ठेवावे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मुरबाड नगर पंचायतीने केले आहे.
--------------------------------------------------
शिरवली धरण दुरुस्त करण्याची फार घाई झाली आहे. मार्च महिन्यानंतर काम चालू केले असते तर ही वेळ मुरबाडकरांवर आली नसती. लघु पाटबंधारे विभाग व मुरबाड नगरपंचायत यांच्यात कोणताही ताळमेळ नाही. मुरबाड शहराला टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल.
- नरेश देसले, मनसे मुरबाड शहर अध्यक्ष