
दुसऱ्या सत्रातही शस्त्रक्रियेची सोय
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई उपनगरीय रुग्णालयांतील शस्त्रक्रियेचा भार आणि प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून नवनवीन पावले उचलली जात आहेत. यामध्ये १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी पहिल्यांदाच तीन रुग्णालयांमध्ये दुसऱ्या सत्रातही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक स्वरूपात राजावाडी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दोन्ही वेळेस शस्त्रक्रिया विभाग (ओटी) सुरू ठेवले जाणार आहे. येत्या १५ दिवसांत याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.
पहिल्या टप्प्यात तीन रुग्णालयांमध्ये ऑर्थोपेडिक्स आणि जनरल सर्जरीची ओटी सुरू केली जाईल. सुरुवातीला एका शिफ्टमध्ये शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढती होती. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी पुढाकार घेत शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी पर्याय शोधला. सध्या पालिकेच्या काही ठराविक उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘डीएनबी’ अभ्यासक्रमाचे प्राध्यापक आणि डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे दुसऱ्या शिफ्टमध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू केला, तर रुग्णांना दिलासा मिळेल. हाडाच्या शस्त्रक्रियेसाठी अनेकदा तत्काळ ओटीची गरज पडते; परंतु १० ते १५ दिवस शस्त्रक्रियेसाठी थांबावे लागते. आता रुग्णांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
आम्हाला संपूर्णपणे शस्त्रक्रिया विभागातील सुविधांचा पुरेपूर वापर करायचा आहे. अधिकाधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करायच्या आहेत. प्रतीक्षा वेळ कमी करून रुग्णांना दिलासा देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
- डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त
दुसऱ्या सत्रात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा तीन रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरू करत आहोत. याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर इतर सर्व रुग्णालयांमध्येही या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. नियमित स्वरूपाच्या शस्त्रक्रिया दुसऱ्या सत्रात करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे.
- डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पालिका उपनगरीय रुग्णालय