
उल्हास नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : पालिकेने जलपर्णी काढण्याची विशेष मोहीम हाती घेतल्याने उल्हास नदी जलपर्णीच्या विळख्यातून मोकळा श्वास घेऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत ही नदी मूळ प्रवाहात दिसणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. एमआयडीसी उल्हासनदीतून पाणी उचलून ते शहाड केंद्रातून विशेषतः उल्हासनगरातील कॅम्प १, २, ३ व ४ च्या काही भागात पाणीपुरवठा करते. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वरप, कांबा व म्हारळ या ग्रामपंचायती जलपर्णी काढत नसल्याने नदीच्या पाण्याच्या प्रवाहात जलपर्णी वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते.
आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक ढोले, परमेश्वर बुडगे यांनी जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू केली आहे.