
निराधारांचे अन्नदाते ‘रॉबिन हूड आर्मी’
खारघर, बातमीदार ः
सामाजिक कार्याची आवड असलेल्या तरुणांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ‘रॉबिनहूड आर्मी’ या सामाजिक संस्थेकडून खारघर, पनवेल, नेरूळ, वाशी आणि कोपरखैरणे आदी झोपडपट्टी परिसरातील गोर-गरीब कुटुंबांना पुरणपोळीचे वितरण करून होळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदा निराधारांची होळी अन्नदानाचे पवित्र काम करून या संस्थेच्या माध्यमातून गोड होणार आहे.
-----------------------------
खारघर, वाशी, कोपरखैरणे, न्यू पनवेल अशा झोपडपट्टी भागात शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘खुशियों की पाठशाला’ हा उपक्रम सुरू केला आहे. आजच्या घडीला या पाठशाळेत जवळपास तीनशे मुले शिक्षण घेत आहेत. हातावर पोट असलेल्या कामगारांच्या मुलांचे शिक्षणासाठी हाल होतात. मुलांना शिक्षण देताना अनेक कुटुंबांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना ‘रॉबिनहूड आर्मी’कडून दर शनिवार आणि रविवार मोफत अन्न तसेच टाटा हॉस्पिटल रुग्णालयाबाहेरील पन्नास नातेवाईकांना दररोज जेवण दिले जात आहे. दरम्यान, होळी असो वा गुढीपाडवा, या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागातील गरजूंना पुरणपोळी वाटप करून यंदा होळी साजरी करण्याचा संकल्प ‘रॉबिनहूड आर्मी’ने केला आहे. या उपक्रमात दीपक सिंग, रूप नारायणसिंग, नंदिता माथूर, रिषभ जैन, पल्लवी सिंग, अमित गांधी, रितू सिंग यांनी विनामूल्य जनसेवेचे व्रत हाती घेतले असून या संस्थेने कोरोना काळातदेखील हजारो कुटुंबांना अन्नधान्य, कपडे वाटप करून जनसेवा केली आहे.
------------------------------------------------
कोरोना काळात अविरत सेवा
कोरोना काळात संत गाडगेबाबा आश्रमामध्ये वास्तव्यास असलेले कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपासमार होत असल्याची माहिती ‘रॉबिनहूड’चे दीपक सिंग यांना मिळाली होती. तेव्हा ‘रॉबिनहूड आर्मी’मधील सदस्यांनी स्वःखर्चातून दोन वेळचे जेवण उपलब्ध करून करून दिले होते. तसेच आजही खारघरमधील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या संस्थेकडून जेवण पुरवले जात आहे.
---------------------------------------
‘रॉबिनहूड आर्मी’ भुकेलेल्यांना जेवण देण्याचे काम करते. होळीला झोपडपट्टीतील मुले तसेच खारघरमधील गाडगेबाबा आश्रमामधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पुरणपोळी वाटप करून होळी साजरी केली जाणार आहे.
- दीपक सिंग, सदस्य, रॉबिनहूड आर्मी