ऐरोलीत वीज चोरीचा भांडाफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीत वीज चोरीचा भांडाफोड
ऐरोलीत वीज चोरीचा भांडाफोड

ऐरोलीत वीज चोरीचा भांडाफोड

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : ऐरोली भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने विजेच्या मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून पाच वर्षांपासून तब्बल १३ लाख २६ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून वाशी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐरोली येथील अलंकार हाऊसिंग सोसायटीतील रो हाऊस क्रमांक ६ मध्ये राहणारे राजेश महाडिक यांच्या घरात एकापेक्षा जास्त एअर कंडिशनर व इतर विद्युत उपकरणे असताना विजेचे युनिट जेमतेम १५० ते २०० इतके येत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे महिन्याला जेमतेम दोन हजार रुपये इतके बिल येत असल्याने महावितरणच्या वाशी परिमंडळातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे आणि त्यांच्या भरारी पथकाने महाडिक यांच्या घरी भेट दिली होती. त्या वेळी भरारी पथकाला महाडिक यांच्या मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवण्यात आल्याचे आढळून आले होते.
---------------------------------------
१३ लाखांचे नुकसान
मार्च २०१८ पासून ५९ महिने विजेची चोरी करून महावितरणचे तब्बल १३ लाख २६ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका महावितरणने महाडिक यांच्यावर ठेवला आहे. तसेच घराची वीज जोडणी तोडून त्यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.