
रेल्वेच्या विविध समस्यांवर रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी नवी मुंबई परिसरातील रेल्वेच्या विविध समस्यांवर शुक्रवारी चर्चगेट येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, नवी मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई रेल विकास निगमचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
या बैठकीत दिघा रेल्वे स्थानकावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, नवी मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील विविध स्थानकांवर स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे आदी मुद्द्यांचा चर्चा झाली. तसेच या वेळी समस्यांचे तात्काळ निराकरण आणि उपयोजना करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर दानवे यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक घेतली, ज्यामध्ये अतिवृष्टीमुळे महाड येथील पूरस्थिती, कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम, वन स्टेशन वन उत्पादनाला चालना, प्रकल्पग्रस्तांना भरपाईचा त्वरित तोडगा काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादीबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, गणपत गायकवाड आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि इतर उपस्थित होते.