कानगोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानगोष्टी
कानगोष्टी

कानगोष्टी

sakal_logo
By

भावनेपेक्षा भविष्य महत्त्वाचे
वडील आणि मुलगा यांच्यामधील न्यायालयीन प्रकरण घडल्यानंतर वकिलांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू होती. असे अनेक कौटुंबिक ताण-तणावाचे प्रकार मुंबई, ठाण्यात घडत असतात. अशावेळी भावना महत्त्वाची की भविष्य, हा प्रश्न प्रामुख्याने न्यायालय विचारात घेत असते, अशी प्रतिक्रिया अनेक वकिलांनी दिली. आपल्याला मुलाचे रडणे, ओरडणे दिसले जे स्वाभाविक आहे, पण त्याचे भविष्य आणि अधिकार वडिलांकडे सर्वाधिक सुरक्षित आहेत, हे देखील लक्षात घ्यायला हवे आणि मुलगा आता नाराज असला तरी होईल ठीक काही दिवसांत, असे विश्लेषण वकिलांनी केले. एखादी घटना बातमी म्हणून जेव्हा सांगितली जाते तेव्हा ती तेवढ्यापुरते मन हेलावून टाकते; पण वेळेनुसार त्यातील पात्रांच्या प्राथमिकता बदलतात. त्यामुळे भावनेत अडकून राहण्यापेक्षा मुलाचे भविष्य महत्त्वाचे आहे, हा व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला तर तो प्रसंग स्वाभाविक वाटतो.

पदोन्नती, बदल्यांची प्रतीक्षाच
परिवहन विभागात पदोन्नती आणि बदल्या होत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एक वर्षात निवृत्त होणार असताना, त्यांना पदोन्नतीची अपेक्षा होती. थेट मॅटमध्ये जाऊन त्यांच्या बाजूने निकालसुद्धा लागला असताना त्यांना पदोन्नतीसाठी वाटच बघावी लागत आहे. अशी अनेक प्रकरणे असताना पदोन्नती आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्याची खदखद व्यक्त केली जात आहे.

अन् लिफ्ट थांबू लागली
विधान भवनात बऱ्याच ठिकाणी कार्यालयांची डागडुजी सुरू असल्याने अनेक कार्यालये आणि त्यांच्या जागा बदलल्या आहेत. अपक्ष आणि विशेषत: समाजवादी पक्षाचे कार्यालयही दुसऱ्या मजल्यावरून थेट नवव्या मजल्यावर गेले; मात्र हा मजला पूर्वी फार वर्दळीचा नसल्याने येथे कोणी नसल्यासारखेच असायचे. त्यामुळे लिफ्ट फार थांबवल्या जात नव्हत्या. ही बाब अनेकांनी तोंडी तक्रारी करूनही ऐकत नव्हते. शेवटी विषय सचिवांपर्यंत गेल्याने त्याला वाचा फुटली. तेव्हा या मजल्यावर कार्यालय असल्याचा साक्षात्कार लिफ्टमनला झाला आणि लिफ्टही थांबू लागल्याने या मजल्यावर येणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वेत चुकीचा पायंडा?
२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४६ च्या सुमारास खारकोपर स्थानकानजीक लोकलचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. बेलापूरहून खारकोपर स्थानकाकडे जात असताना हा अपघात घडला. या घटनेला ४ दिवस उलटून गेले तरी या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही; परंतु मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी घटनास्थळी साधी भेटही दिलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण रेल्वेच्या एखाद्या मोठ्या अपघातानंतर स्वतः महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापक हे घटनास्थळी दाखल होऊन प्रत्यक्ष पाहणी करतात; परंतु खारकोपरमध्ये झालेल्या लोकल दुर्घटनेत असे घडले नाही. त्यामुळे मध्य रेल्वेत हा चुकीचा पायंडा सुरू तर झाला नाही ना, अशी चर्चा अन्य अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
---------

-- सुनिता महामुणकर, प्रशांत कांबळे, संजीव भागवत, नितीन बिनेकर