गावागावांमध्ये ग्रामदेवतेला साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावांमध्ये ग्रामदेवतेला साकडे
गावागावांमध्ये ग्रामदेवतेला साकडे

गावागावांमध्ये ग्रामदेवतेला साकडे

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. ५ ः तालुक्यात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. होळीच्या पंधरा ते वीस दिवस आधीपासूनच गावागावांमध्ये ग्रामदेवतेला गायनातून प्रार्थना केली जाते. तसेच पारंपरिक खेळांनीच शिमगोत्सवाची सुरुवात झाली आहे; तर काही गावांमध्ये पाच रात्री होळीच्या निमित्ताने गावात सामाजिक आनंदोस्तव पहायला मिळतो.
श्रीवर्धन तालुक्यात होळी सर्वच गावात साजरी होते. मात्र बोर्लीपंचतन, शिस्ते, वडवली, आदगाव या ठिकाणी देवीची पारंपरिक पालखी नाचवली जाते. यात हिंदू धर्मातील बांधव मोठ्या भक्तीभावात सहभागी होतात. विशेषतः तरुण वर्ग हा पालखी नाचवण्यासाठी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. पंचमीला पहिल्या होळीचे प्रारंभ होते. होळीच्या पूर्वसंध्येला गावाजवळचे आंब्याचे झाड किंवा माडाचे झाड, पोफळीचे झाड निवडले जाते. निवडलेल्या झाडाची विधिवत पूजा करून ते झाड तोडून वाजतगाजत मिरवणुकीने ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर आणले जाते. तालुक्यातील प्रत्येक गावात असे चित्र पहायला मिळत आहे.
-------------------------------------------------------
खास पद्धतीने गाऱ्हाणे
मंदिरासमोर आदल्या वर्षीच्या होळीच्या झाडाचा खूंट असतो. तो बाहेर काढला जातो. त्या ठिकाणी नवीन झाडाचा ओंडका उभारला जातो. त्यावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि नारळ बांधला जातो. त्याभोवती सुकलेला पालापाचोळा, काटक्या रचून होळी तयार केली जाते. त्यानंतर होळीचे पूजन करून नवैद्य दाखवला जातो आणि खास पद्धतीने गाऱ्हाणे घातले जाते.
-------------------------------------------------------------
विशिष्ट गणवेशातील ‘खेळे’ आकर्षण
खास गणवेश परिधान केलेले गावागावांतील ‘खेळे’ होळी आधी साधारण चार-पाच दिवस घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे, हे खेळे अनवाणी असतात. शेजारील गावांतील प्रत्येक घरात डफ, टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचल्यानंतर होळीच्या पूर्वसंध्येला हे खेळे माघारी परततात. घराच्या अंगणात नाचणाऱ्या खेळ्यांच्या चमूला ओवाळणी घालण्याची प्रथा आहे.
----------------------------------------
छायाचित्र ः वडवली गावातील देवीच्या पोऱ्यासह खेळी.