
अवजड वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक
अलिबाग, ता. ८ (बातमीदार)ः तालुक्यातील उसर-गेल कंपनीमध्ये प्रोपेन-डिहायड्रोजनेशन आणि एकात्मिक पॉलीप्रॉपिलीन (पीडीएच- पीपी परियोजना) प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी लागणारे साहित्य, यंत्र सामग्रीची वाहतूक पेण-अलिबाग मार्गावरून होत आहे. प्रकल्पातून हजारो कामगारांना रोजगार मिळाला असला तरी प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्यांची वाहतूक धोकादायकरीत्या होत असल्याचे चित्र आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहनांमध्ये कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
घरगुती वापरासह, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या कामांसाठी प्लास्टिक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात गाड्या, इंजेक्शन, बाटल्या, घरगुती वापरासाठी जार, कप आदी वस्तूंचा समावेश असून त्यासाठी पॉलीप्रॉपिलीनच्या दाण्यांची गरज वाढत आहे. २०२१ मध्ये पाच हजार ४८० केटीए इतकी मागणी होती. २०३० पर्यंत ही मागणी दुप्पट होऊन दहा हजार २३० केटीए इतकी होणार आहे. ही गरज ओळखून केंद्र सरकारने अलिबाग तालुक्यातील उसरमध्ये प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पामध्ये कच्चा माल तयार केला जाणार असून त्यासाठी लागणारा माल विदेशातून जहाजाद्वारे उसर जेट्टीपर्यंत आणला जाईल. त्यानंतर पाईपलाईनद्वारे त्याचा पुरवठा कंपनीपर्यंत केला जाणार आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील उसर या ठिकाणी सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रात प्रकल्प निर्माण केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे आठ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. प्रकल्पाचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारे लोखंडी पाईप, स्टीलची वाहतूक पेण - अलिबाग मार्गावरून होत आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचे समोर आले आहे. प्रकल्प उभारणीसाठी लागणारे साहित्यांची वाहतूक करताना सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही. वाहनात क्लिनर नसतो. चार दिवसांपूर्वी पेणहून गेल कंपनीत लोखंडी पाईप आणताना, ते रस्त्यावर पडले. सुदैवाने अवजड वाहनाच्या मागे त्या वेळी अन्य वाहन नव्हते, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. लोखंडी पाईप व स्टीलची वाहतूक करताना पूर्ण पॅकिंग करणे आवश्यक आहे, मात्र बऱ्याचदा केवळ दोरीच्या साह्याने ते बांधले जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. अलिबाग मार्गावरील गोंधळपाडा येथेही याच वाहनातील पाईप पडण्याची शक्यता होती. त्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताची भीती
वाहतूक पोलिसांच्या मदतीने अवजड वाहतुकीमुळे झालेली कोंडी सुरळीत करण्यात आली. अवजड मालवाहतुकीसाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांही तोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. चालकाच्या निष्काळजीमुळे अवजड वाहनाच्या अपघाताची भीती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवजड मालाची वाहतूक करताना, सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत कंपनी प्रशासन, ठेकेदारांनी लक्ष ठेवावे. वाहतुकीदरम्यान अपघात झाल्यास, कठोर कारवाई करण्यात येईल.
- सुवर्णा पत्की, वाहतूक पोलिस निरीक्षक