वीज सुरक्षेची शपथ अन् तणावमुक्तीचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज सुरक्षेची शपथ अन् तणावमुक्तीचे धडे
वीज सुरक्षेची शपथ अन् तणावमुक्तीचे धडे

वीज सुरक्षेची शपथ अन् तणावमुक्तीचे धडे

sakal_logo
By

पालघर, ता. ५ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वीज वितरण व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर मंडल कार्यालयात शनिवारी (ता. ४) लाईनमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणचा जनमानसातील आरसा असणाऱ्या जनमित्रांचा या वेळी यथोचित सन्मान करून सुरक्षेबाबत प्रबोधन व तणावमुक्त कामाचे धडे देण्यात आले.
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती तसेच इतरही अनेक प्रसंगात अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अखंडित सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकारी अभियंता युवराज जरग यांच्या अध्यक्षतेखाली लाईन्स क्लबच्या सभागृहात पालघर मंडलाचा कार्यक्रम घेण्यात आला. मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापक कीर्ती माळी, उपकार्यकारी अभियंते, सहायक अभियंते, कर्मचारी व ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियमित व बाह्यस्त्रोत महिला आणि पुरुष जनमित्रांचा सन्मान करण्यात आला.

---------------
तरफ्याच्या तालावर फेर
उपकार्यकारी अभियंता रमेश कदम यांनी उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन खबरदारीबाबत प्रबोधन केले. शिवाय महिला व पुरुष जनमित्रांनी त्यांचे अनुभव कथन केले. ॲड. वर्षा सातपुते यांनी ताणतणाव व्यवस्थापनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विक्रमगड, बाईसर ग्रामीण, जव्हार आणि मोखाडा उपविभागीय कार्यालयांमध्येही स्वतंत्रपणे लाईनमन दिवस उत्साहात साजरा झाला. जव्हार उपविभागीय कार्यालयात तरफा वाद्यावर ताल धरत जनमित्रांनी यावर्षी प्रथमच साजरा होत असलेल्या लाईनमन दिवसाचा आनंद द्विगुणित केला.