
रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीची महिलांना आरोग्यवर्धक भेट
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी व आरोग्य हेल्थ केअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रक्तातील सीबीसी तपासणी शिबिराचे आयोजन गत रविवारी (ता.५) कात्रप येथे करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ सिटीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. मोफत सीबीसी तपासणी शिबिर वेळी सुमारे ७० महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. या वेळी रक्तातील सीबीसीमध्ये महिलांच्या हिमोग्लोबीनची मात्र किती आहे; लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेटची संख्या किती आहे तसेच रक्तगट तपासले गेले. महिलांच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण हे कमी असते, त्यामुळे त्यांची तपासणी करून योग्य तो सकस आहार घेतला तर हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवत येऊ शकते याकरता रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी व आरोग्य हेल्थ केअर लॅब यांनी हा उपक्रम राबवला होता. या वेळी रोटरी क्लबच्या प्रकल्पप्रमुख प्रियंका डुडेजा, सचिव नितू नायर, डॉ. सुतेजा स्वामी, ॲड. निरजा आंबडे, वरुण मौर्या, श्वेता फिरके उपस्थित होत्या.