बाजारात शेंगदाण्‍याने खाल्‍ला भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारात शेंगदाण्‍याने खाल्‍ला भाव
बाजारात शेंगदाण्‍याने खाल्‍ला भाव

बाजारात शेंगदाण्‍याने खाल्‍ला भाव

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ७ (बातमीदार) : गेल्या दहा दिवसांत शेंगदाण्याच्‍या भावात वाढ झाली आहे. किलोमागे शेंगदाण्याचे भाव हे दहा ते पंधरा रुपयांनी वाढलेले आहेत. यंदा लागवड कमी झाल्याने आवक कमी झाली असून मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेंगदाण्याचे भाव वाढले आहेत.

शेंगदाण्याच्या दरात घाऊक आणि किरकोळ दोन्हीही बाजारांत वाढ झालेली असून, बाजारात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातून शेंगदाण्याची आवक होते. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे शेंगदाण्याची लागवड केली जाते. दक्षिणेकडील राज्यातील शेंगदाण्याची प्रत चांगली असते; परंतु त्‍याची महाराष्ट्रात आवक कमी होते.

किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. हे दर प्रतवारीनुसार ११० ते १४० रुपये आहेत. शेंगदाणा दरातील तेजी अशीच टिकून राहणार असल्‍याचे व्यापारी भुवन सिंग यांनी सांगितले. किरकोळ बाजारात शेंगदाण्याला वर्षभर मागणी असते. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश येथील शेंगदाणा मोठ्या प्रमाणात विक्रीस येतो. सणासुदीत शेंगदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. शेंगदाण्याला तेलनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मोठी मागणी असून शेंगतेलाचा वापरही वाढलेला आहे.
--------------------------------------
शेंगदाण्याचे दर
जाडा शेंगदाणा १२० ते १३० रुपये
जी टेन शेंगदाणा ११० ते १२० रुपये
घुंगरू शेंगदाणा ११५ ते१३० रुपये
स्पॅनिश शेंगदाणा १३० ते १४० रुपये
डिस्को शेंगदाणा १४० ते १५० रुपये
काठियावाडी शेंगदाणा १८० रुपये
------------------------------------------------
शेंगदाण्याचे भाव वाढल्याने स्वयंपाकघरात शेंगदाण्याचा वापर कमी करावा लागणार आहे.
- अश्विनी भोईर, गृहिणी
---------------------------------
सर्वत्र महागाई झालेली आहे. भाजीपाला, मसाल्याचे दर, शेंगदाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे आमचे बजेट कोलमडत असून, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
- ज्योती प्रजापती, गृहिणी