
गावाचा शिस्तबद्ध विकास करा
पालघर, ता. ७ (बातमीदार) : निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांमध्ये तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. हा वर्ग इंटरनेटचा वापर लीलया करतो. विविध योजनांचे लोकोपयोगी ॲप आलेले आहेत. त्याचा योग्य तो वापर करून तरुण सदस्यांनी गावातील जनसामान्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून द्या व गावाच्या शिस्तबद्ध विकास करा, असे आवाहन बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांनी सरपंच व सदस्यांच्या प्रशिक्षण शिबिरात केले.
शिक्षक पतपेढी भवनात बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे वसई-विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, आमदार राजेश पाटील, माजी मंत्री मनीषा निमकर, तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, पी. टी. पाटील, प्रज्ञा तरे आदी उपस्थित होते. तुम्ही कोणत्याही सामाजिक कामामध्ये काम करत असताना तिथल्या कामांमध्ये वेळ देणे महत्त्वाचे आहे. ज्या ग्रामपंचायतीमधून तुम्ही निवडून आला आहात त्या ठिकाणी समाजकारण करण्यासाठी दररोज एक तास दिला पाहिजे. त्यामुळे गावचा विकास जलदगतीने होईल व गावचा योग्य पद्धतीने विकास होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राजीव पाटील यांनी सांगितले.