
वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत
दिवा, ता. ७ (बातमीदार) : खाडीकिनारी असलेल्या मुंब्रा, दिव्यात सोमवारी (ता. ६) संध्याकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन वादळी वारे सुटले. सकाळी ऊन पडलेले असताना संध्याकाळी काही भागांतील वातावरणात अचानक बदल होऊन जोराचे वादळी वारे वाहू लागले. वाऱ्यामुळे दुचाकी, कारचालकांना वाहने चालवणे मुश्कील झाले होते. यामुळे रेल्वेवरही परिणाम झाला. दिव्यात काही घरांचे पत्रे उडाले; तर रस्त्यावर पडलेला कचरा उडून दिवा टर्निंगला भोवरा तयार झाला होता. विजेचे खांब, झाडे कोसळण्याचे प्रमाण दिव्यात हल्ली वाढलेले आहे. संध्याकाळी सुटलेल्या या वादळी वाऱ्याने दिव्यात पुन्हा हाहाकार माजवला. दिवा आणि कोपरमधील काही ठिकाणची वीज खंडित झाली होती; तर डोंबिवलीत सामान्यांना रस्त्याने चालणेही जिकिरीचे झाले होते. वाऱ्याच्या धुळीमुळे पंधरा ते वीस मिनिटे तरी रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.