होळीतील पुरणपोळ्या गरीबांच्या मुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळीतील पुरणपोळ्या गरीबांच्या मुखी
होळीतील पुरणपोळ्या गरीबांच्या मुखी

होळीतील पुरणपोळ्या गरीबांच्या मुखी

sakal_logo
By

सरळगाव, ता. ७ (बातमीदार) : ‘एक गाव एक होळी’ ही शेकडो वर्षांची परंपरा जोपासत शिवळे गावात होळी महोत्सव साजरा करण्यात आला. नैवेद्य म्हणून आणलेल्या शेकडो पुरणपोळ्या होळीत न जाळता गोरगरीबांच्या मुखी लागल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
मुरबाड तालुक्यातील अनेक गावांत आपापल्या कुटुंबाची, आपल्या आळीची; तर काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या नावानेही होळी महोत्सव साजरा केला जातो. शिवळे गावात मात्र अनेक पंथांचे, अनेक धर्मांचे, अनेक विचारांचे व अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राहत असतानाही आजही शेकडो वर्षांची ‘एक गाव एक होळी’ ही परंपरा जोपासली आहे. या वर्षीही गावाची एकच होळी पेटवून ही परंपरा अखंडित ठेवल्याने तालुक्यातून कौतुक होत आहे. गावातील इसामे कुटुंबीयांचे कुलदैवत गावातून वाजतगाजत होळीच्या ठिकाणी आणले जातात. या ठिकाणी पूजाअर्चा करून फोद्यारे हो... अशी आरोळी ठोकून होळी पेटवली जाते.

---------------------
तरुणांनी लढवली शक्कल
होळी पेटवण्यासाठी गावातील शेकडो नागरिक होळीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. शेकडो महिला होळीला नैवद्य म्हणून आपल्या नैवद्याच्या ताटात एक पुरणपोळी होळी पेटवल्यानंतर होळीत टाकण्यासाठी आणत असतात. त्या पोळ्या होळीत जळून जातात याची दखल गावातील तरुणांनी घेतली. या वर्षी होळीसाठी आणलेल्या पुरणपोळ्या होळीत न टाकता एकत्र गोळा करून गावाच्या परिसरातील ज्या कुटुंबांत पुरणपोळी तयार झाली नाही अशा घरात देऊन त्यांच्याही घरात होळीचा आनंद फुलवण्याचे काम तरुणांनी केल्याने कौतुक होत आहे.

------------
विजेचा लपंडाव, पावसाची हजेरी
होळी पेटवण्याआगोदरच विजेचा लपंडाव सुरू होता. लाईट नसल्याने होळीच्या ठिकाणी पेटवलेल्या आरतीच्या ताटातील दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून गेला होता. त्याच वेळी पावसाने हजेरी लावली. एका बाजूला पेटलेल्या होळीचे चटके बसत असताना अंगावर पडणारे थंड पावसाचे थेंब जणूकाही अंगाला बसणाऱ्या चटक्यांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दृष्य पाहायला मिळाले.