मालकी हक्क नसलेल्या फ्लॅटची विक्री करुन ४७ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालकी हक्क नसलेल्या फ्लॅटची विक्री करुन ४७ लाखांची फसवणूक
मालकी हक्क नसलेल्या फ्लॅटची विक्री करुन ४७ लाखांची फसवणूक

मालकी हक्क नसलेल्या फ्लॅटची विक्री करुन ४७ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

अंधेरी, ता. ७ (प्रतिनिधी) ः मालकी हक्क नसलेल्या दोन फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करून एका महिलेसह दोघांची सुमारे ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या कटातील आरोपीस तीन महिन्यांनंतर कुरार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अमित येवले असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात त्याला गणेश गुप्ता आणि वैभव पिसे या दोघांनी मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यात अमित सध्या पोलिस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

४० वर्षांची तक्रारदार महिला मालाडच्या कुरारगावात राहत असून तिचे तिथेच एक दुकान आहे. याच परिसरात गणेश हा राहत असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. या महिलेला नवीन घर घ्यायचे होते. याबाबत तिने गणेशला सांगितले होते. गणेशने तिला माऊली डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील कुरारगावात एका एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे त्याचा मित्र अमितचा एक फ्लॅट आहेत. त्याचा फ्लॅट तिला कमी किंमतीत मिळवून देतो, असे सांगून तिचा विश्‍वास संपादन केला. त्‍यानंतर फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. या वेळी त्याने तिला फ्लॅटची काही कागदपत्रे दाखविली होते. गणेशवर विश्‍वास ठेवून ऑक्टोबर २०२० ते जून २०२२ या कालावधीत तिने अमीतला २३ लाख ५० हजार रुपये दिले होते. २२ एप्रिलला तिथे गेल्यानंतर तिला तो फ्लॅट अमितच्या मालकीचा नसल्याचे समजले. याबाबत तिने या दोघांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी तिला उडवाउडवीचे उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी तिचे फोन घेणे बंद केले होते. त्यामुळे तिने तिथे जाऊन चौकशी केली असता या दोघांनी फ्लॅटचे बोगस कागदपत्रे देऊन तिची फसवणूक केल्याचे समजले. अशाच प्रकारे त्यांनी अन्य व्यक्तीची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी या तिघांविरुद्ध कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर गणेश गुप्ता, अमित येलवे आणि वैभव पिसे या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या तिघांचा शोध सुरू असतानाच अमित येवले याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतरांची फसवणूक केली आहे का, याचा आता पोलिस तपास करीत आहेत.