
वन जमिनींवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करा
मनोर/पालघर, ता. ७ (बातमीदार) : वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची भूमाफियांसोबत मिलीभगत असल्याने महामार्गालगतच्या वनविभागाच्या मालकीच्या मोक्याच्या जमिनींवर अतिक्रमणे झाल्याचे सांगत खासदार राजेंद्र गावित यांनी संताप व्यक्त केला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असून कर्मचाऱ्यांवर उपवनसंरक्षकांचे नियंत्रण नसल्याचे सांगत उपवनसंरक्षकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुजोर वन कर्मचाऱ्यांवर कारवाई, महामार्गालगतच्या वनजमिनींवरील अतिक्रमणे हटवून तोडक कारवाई आणि कुडे गावातील वादातीत जागेची फेरमोजणी करण्याचे निर्देश खासदारांनी सोमवारी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिले.
सोमवारी (ता. ६) पालघरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीला, जिल्हा परिषदेच्या सदस्या विनया पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आणि मच्छीमार नेत्या ज्योती मेहेर, उपजिल्हाधिकारी संदीप पवार, पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे, दहिसर आणि पालघर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सातपाटी, खारेकुरण, मासवण, धुकटन, कुडे आणि दहिसरतर्फे मनोर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
महामार्गालगतच्या वनविभागाच्या मोक्याच्या जमिनींवर अतिक्रमणे वाढत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामात वनविभागाकडून केली जात असलेली आडकाठी, सातपाटी, खारेकुरण परिसरातील मिठागरांची बांधदुरुस्ती आणि खाजण जमिनीत मासेमारीसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेला अटकाव आदी विषयांवर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी उपवनसंरक्षक मधुमीथा एस. यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीला खासदारांनी कुडे गावाच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतची मोक्याची वनजमीन भूमाफियांकडून भूमी अभिलेख आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या प्रकाराबाबत कुडे गावचे ग्रामस्थ आणि वनव्यवस्थापन समितीकडून माहिती घेतली.
---------------------
आडकाठी आणणाऱ्यांची बदली करा
सातपाटी आणि खारेकुरण गावाच्या हद्दीतील मच्छीमार सोसायटीच्या मालकीच्या मिठागरांचे तुटलेले बांध बांधण्याच्या कामात वनविभागाचे कर्मचारी अडथळा निर्माण करीत आहेत. खाजण जमिनीत मासेमारी आणि खेकडे पकडण्यासाठी मनाई केली जात असल्याने मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करीत मुजोर वन कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सातपाटी आणि खारेकुरणच्या ग्रामस्थांनी केली. आडकाठी निर्माण करणारे वनरक्षक कामडी आणि मासवण येथे जलजीवनच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात खोडा घालणारे वनरक्षक जाधव यांच्यावर बदलीची कारवाई करण्याचे निर्देश खासदारांनी दिले.
--------------------
‘जलजीवन’चे काम तातडीने करा
जलजीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख योजना असून ग्रामीण भागात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जलजीवन योजनांच्या कामांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हेतुपुरस्सर आडकाठी निर्माण करू नये. वनहक्क अधिनियमाच्या कलम ३.२ च्या तरतुदीनुसार प्रस्ताव दाखल घ्यावेत आणि तातडीने प्रस्तावांना मान्यता देण्याचे निर्देश उपवनसंरक्षक मधुमिथा यांना दिले.