
पनवेल खरेदी केंद्रावरचा भात भिजला
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ७ ः पनवेल सहकारी भात खरेदी केंद्रावर दोन महिन्यांपासून पडून राहिलेला भात वेळेत न उचलल्यामुळे अखेर मंगळवारी अवकाळी पावसात भिजला. सकाळपासून झालेल्या पावसाच्या शिडकावाचा फटका केंद्राबाहेर उघड्यावर ठेवलेल्या भाताच्या गोण्यांना बसला आहे. ‘सकाळ’ने भात भिजण्याची शक्यता या आधी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात वर्तवली होती.
दरवर्षी खरीप हंगामातील भाताची खरेदी ३१ मार्चपर्यंत चालते. मात्र या वर्षी त्याआधीच भात खरेदी करण्याची मुदत सरकारकडून देण्यात आली होती. यादरम्यान भात भरडण्याचा ठेका देणाऱ्या कंत्राटदारांची मुदत संपून गेल्याचा विसर रायगड जिल्हा प्रशासनाला पडला होता. भात खरेदी केंद्रांवर भात पडून होता. पनवेल सहकारी भात खरेदी केंद्रावर प्रमाणापेक्षा अधिक भात खरेदी केल्यामुळे बहुतांश भाताच्या गोण्या गोदामाबाहेर ठेवण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत लवकरात लवकर भाताच्या गोण्याच्या उचलण्याची व्यवस्था करावी अशी विनंती भात खरेदी केंद्र चालकाकडून करण्यात येत होती. दरम्यान भात उचलण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती न झाल्यामुळे पनवेलच्या सहकारी भात खरेदी केंद्रावर तब्बल पाच हजार क्विंटल भात पडून राहिला.
जानेवारीच्या १५ तारखेपासून मार्च महिला उजाडला तरी भाताच्या गोण्या उन्हात उघड्यावर पडल्या आहेत. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली होती. १६ फेब्रुवारीला तेव्हा लवकरच ठेकेदारांची नियुक्ती करून पडलेला भात उचलण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही योग्य दखल न घेतल्याने अवकाळी पावसात उघड्यावर पडलेला भात भिजला.
भात खरेदी केंद्रांवरचा भात उचलण्यासाठी भरडण्याचे कंत्राट नियुक्ती करण्यास उशीर झाला. तसेच कागदपत्रांच्या अडचणींमुळे ठेकेदार नियुक्त करता येत नव्हते. परंतु दोन दिवसांत संपूर्ण भात उचलला जाईल. तसेच भात भिजणार नाही याची काळजी घेऊ.
- केशव ताटे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.