
अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका
मनोर, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सोमवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागायतदार, फूलशेती, भाजीपाला लागवड करणारे शेतकरी आणि वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे विजांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांसह आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. गवत आणि कच्ची वीट पावसात भिजून वाया गेल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नुकसानाच्या आकडा वाढण्याची शक्यता नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. पावसामुळे काही ठिकाणी खांब कोसळले आहेत; तर विजेच्या तारा तुटल्याने सोमवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता.
हवामान खात्याने पुढचे दोन दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरी आणि वीट उत्पादक हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात होळी आणि धुळवडीचा उत्साह असतानाच सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावून जिल्हावासीयांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जव्हार मोखाडा भागात रविवारी संध्याकाळीच पावसाला सुरुवात झाली होती. सोमवारी सायंकाळी होळी साजरा होण्याआधी दुपारी बाराच्या सुमारास पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भागात गारपिटीसह झालेल्या पावसामुळे आंब्याच्या झाडांचा मोहोर आणि फळे गळून पडली आहेत. भाजीपाला लागवड करणारे बागायतदार आणि फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-------------------
वीट उत्पादकांची तारांबळ
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी पहाटे सुरू झालेला पाऊस आणि गारपिटीने आंबा, चिकू, मिरची उत्पादक शेतकरी, बागायतदार आणि फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तासभर बरसलेला पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्याने आंब्याचा मोहोर आणि फळे गळून पडली आहेत. वीट उत्पादकांनी रचून ठेवलेल्या कच्च्या विटा पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्याने वीट उत्पादक हवालदिल झाले आहेत. दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने कच्च्या विटा वाचवण्यासाठी वीट उत्पादकांची तारांबळ उडाली आहे. गवताच्या व्यापाऱ्यांनी डिसेंबर महिन्यापासून गवत आणि पावली खरेदी करून साठवणूक केलेल्या गंजी आणि तयार गठड्या अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
-------------
रविवारी झालेल्या पावसामुळे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील आंबा आणि काजूची लागवड असलेल्या ७६० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. पहाटे आणि सोमवारी सायंकाळी झालेल्या नुकसानीची माहिती बुधवारी उपलब्ध होईल. नुकसानीबाबत शासनाला कळवण्यात आले आहे. नुकसानभरपाईबाबत कोणतेही निर्देश मिळाले नाहीत.
- दिलीप नेरकर, जिल्हा कृषी अधिकारी, पालघर
--------------------
वीज पडून गवताचे नुकसान
सोमवारी पहाटे साखरे गावात वीज पडून लागलेल्या आगीत पावलीच्या सुमारे दोनशे गाठड्या जळून खाक झाल्या आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या दोन बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पालघर जिल्ह्यात पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्याने बागायतदार, शेतकरी, गवताचे व्यापारी आणि वीट उत्पादक हवालदिल झाले आहेत.