
गरजवंतांच्या आशेची पालवी
गरजवंतांच्या आशेची पालवी, मायेची सावली : रोशनी सुलाखे
पालघर (प्रकाश पाटील) जागतिक महिला दिनाच्या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो. समाजात अशा महिला मोठ्या प्रमाणत आहेत, ज्यांनी आपल्या कामातून समाजमनावर वेगळा ठसा उमटवला आहे. आज समाजामध्ये अगदी बोटावर मोजण्याइतके लोक परिस्थितीवर मात करून कष्टाने उभ्या केलेल्या सर्वस्वाला इतरांसाठी उपयोगात आणत असताना दिसून येतात. पालघरमधील गरजवंतांची आशेची पालवी आणि मायेची सावली म्हणून परिचित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या रोशनीताई काशिनाथ सुलाखे या त्यातीलच एक.
रोशनी सुलाखे या पालघरमधील माकूणसारसारख्या छोट्याशा गावात, एका सामान्य कुटूंबात जन्मलेल्या एक ध्येयवेड्या सामान्य महिला. परिस्थितीची जाणीव ठेवत, आपल्या गरीब परिस्थितीच्या वेळी आपण जे हाल व यातना सहन केल्या त्या इतरांनी सोसू नये म्हणून रोशनीताई आज अनेक गरीब कुटूंबांचा भक्कम आधार बनत आहेत. कुणाच्या घरी आजारी व्यक्ती असल्याचे समजताच रोशनी सुलाखे त्या ठिकाणी स्वतः धाव घेऊन त्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करतात. आजारी व्यक्तीपर्यंत मदत पोहचवून त्याचा लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च रोशनीताई या स्वतः तसेच काही दानशूर व्यक्तींकडून मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. आजपर्यंत अनेक कुटूंबियांचा आधार बनलेल्या रोशनी सुलाखे यांना त्या मोबदल्यात गरीब कुटूंबाचे आशीर्वाद आणि प्रेम मिळते. गरजवंतांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे कैकपटीने मला पुढील कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करते, असे मत रोशनीताई व्यक्त करतात.
आजवर रोशनीताईंनी गरीब कुटुंबातील रुग्णांना लाखो रुपयांचे अर्थसहाय्य केलेले असून गरजू विद्यार्थ्यांनादेखील त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ पुरवलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पालघर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंनादेखील लाखो रुपयांचे अर्थसहाय्य पुरवून रोशनीताई एकप्रकारे ही देशसेवाच करत आहेत. लहान मुले व वृद्ध यांच्याबद्दल रोशनी सुलाखे यांना विशेष काळजी वाटत असल्याने प्रसंगी त्यांना आर्थिक मदत करताना त्या भावुक देखील होतात. कोरोना महामारीमध्ये देखील अनेक गरजवंतांना त्यांनी लाखो रुपयांची मदत केलेली असून अजूनही आईवडील नसलेल्या अनाथ मुलांना त्या दत्तक देखील घेताना दिसून येतात.
हल्लीच्या स्वतःभोवतीच्या वलयांकृत, स्वार्थी जगात रोशनीताईंसारखी मायेची सावली गरजूंचा आधार बनून, त्यांच्यामागे दत्त म्हणून ठामपणे उभी राहते ही गोष्ट सर्वसामान्य मनाला भावत असल्याने आज रोशनीताईंचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक पुरस्कारांनी रोशनीताईंना सन्मानित करण्यात आले असून या सेवाभावी वृत्तीमागे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ व जेष्ठ दिवंगत नेते नवनीतभाई शहा यांची प्रेरणा असल्याचे मत त्या व्यक्त करतात.