
पोलिस भरती प्रक्रियेतील आठ उमेदवारांवर गुन्हा
मुंबई, ता. ७ : पोलिस भरतीसाठी आलेल्या आठ उमेदवारांनी धावण्याच्या चाचणीत जास्त गुण मिळवण्यासाठी पायाला ‘रनिंग चिप’ लावल्याचा प्रकार मरोळ पोलिस मैदान या ठिकाणी समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात या उमेदवारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले उमेदवार एकाच जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस भरती प्रक्रियेत धावण्याच्या चाचणीचे अंतर आणि वेळ मोजण्यासाठी उमेदवारांच्या दोन्ही पायांमध्ये विशेष उपकरण बसवले जाते. उमेदवाराने किती वेळात धावण्याचे अंतर पूर्ण केले याची नोंद होऊन त्यानुसार उमेदवारांना गुण दिले जातात. रनिंग चीप लावून धावण्याचे अंतर पार करण्यासाठी लावलेल्या उपकरणातील वेळेच्या नोंदींशी छेडछाड केली जाते. ही अत्याधुनिक प्रणाली प्रथमच पोलिस भरतीत वापरण्यात आली आहे. मुंबईत भरतीसाठी आलेल्या आठ उमेदवारांनी मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आव्हान दिले आहे.