
मुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबईत
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उद्यापासून (ता. ८) सुरू होणारे राज्यस्तरीय प्रदर्शन १९ मार्चपर्यंत चालणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळून त्यांची व्यवसायवृद्धी व्हावी, असा प्रदर्शनाचा उद्देश आहे. दरवर्षी मुंबईतील वांद्रे येथे भरवण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवी मुंबईत भरवण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये साधारण ५११ स्टॉल असणार आहेत. महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण ११९ स्टॉल येणार आहेत. तसेच नाबार्डचे ५० स्टॉल यात आहेत.