बेकायदा फेरीवाल्यांना राजकीय आश्रय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा फेरीवाल्यांना राजकीय आश्रय
बेकायदा फेरीवाल्यांना राजकीय आश्रय

बेकायदा फेरीवाल्यांना राजकीय आश्रय

sakal_logo
By

जुईनगर, ता. ८ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरामध्ये बेकायदा फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे येथे वाढत्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांना राजकीय आश्रय मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या फेरीवाला हटाव मोहिमेलाच खीळ बसल्याचे चित्र आहे.
सानपाडा, जुईनगर, तुर्भे, कोपरी गाव अशा अनेक ठिकाणी फेरीवाले वाढले आहेत. या विभागामध्ये पालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करत आहेत, पण राजकीय आश्रय असल्यामुळे एकीकडे त्यांच्या कारवाईला विरोध करण्याचे प्रकार वाढले आहेत; तर दुसरीकडे अनेकदा महिला फेरीवाल्यांकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर धाऊन जाण्याचे प्रकारदेखील होत आहेत. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करताना अडथळे येत आहेत.
---------------------------------------------------
‘या’ पदपथांवर अतिक्रमण
सानपाडा सेक्टर ३, ४, ५, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, सानपाडा रेल्वे स्थानक, मोराज, सिटी मॉलजवळील सर्व्हिस रोड, जुईनगर, कोपरीगाव, तुर्भे नाका ते फायझर रोड या सर्व ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथांवर बस्तान मांडले आहे. तसेच एपीएमसी सिग्नल ते सिटी मॉलपर्यंत बसणारे सलूनवाले, कांदा-बटाटे विक्रेते यांच्यावर कधी तरी थातुरमातुर कारवाई केली जाते. अशीच परिस्थिती एपीएमसी सिग्नल ते महावीर सेंटर बिल्डिंगसमोरील पदपथावरील फेरीवाले आणि मसाला मार्केटमध्ये जाण्याच्या गेटवरदेखील आहे.
--------------------------------------
बेकायदा फेरीवाल्यांवर सकाळ तसेच संध्याकाळी सातत्याने कारवाई केली जात आहे. या कारवाईला कोणाचाही विरोध नसून पुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे.
- भरत धांडे, सहायक आयुक्त, तुर्भे विभाग कार्यालय