मेट्रोच्या आकुर्ली आणि एक्सर स्थानकांचे सुकाणू महिलांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोच्या आकुर्ली आणि एक्सर स्थानकांचे सुकाणू महिलांकडे
मेट्रोच्या आकुर्ली आणि एक्सर स्थानकांचे सुकाणू महिलांकडे

मेट्रोच्या आकुर्ली आणि एक्सर स्थानकांचे सुकाणू महिलांकडे

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ ः एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गिकेवरील आकुर्ली आणि एक्सर स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही स्थानकांचे सुकाणू महिलांच्या हाती असून तिन्ही शिफ्टचे व्यवस्थापन त्याच सांभाळत आहेत.

स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यापर्यंत ७६ महिला कर्मचाऱ्यांमार्फत मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर स्थानकांच्या व्यवस्थापनास सुरुवात झाली आहे. परिणामी आकुर्ली आणि एक्सर महाराष्ट्रातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके ठरली आहेत. परिवहन क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित करून कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन देणे उपक्रमाचा उद्देश आहे.

आकुर्ली आणि एक्सर स्थानकांवरील सर्व-महिला कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत. स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साईज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी मेट्रो प्रवाशांना मदत करतील. सुरक्षा आणि सफाई कर्मचारीही महिलाच आहेत. मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करतील. मेट्रोचा उपक्रम केवळ परिवहन उद्योगातील महिलांच्या क्षमता अधोरेखित करणारा नसून इतर महिलांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करणारा ठरेल.

२७ टक्के महिला कर्मचारी
मेट्रोच्या व्यवस्थापनासाठी सुमारे २७ टक्के म्हणजे ९५८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते देखभाल आणि दुरुस्ती, एचआर, वित्त आणि प्रशासन विभागात कार्यरत आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी मिळण्याची खात्री करण्याकरिता एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने अशा निर्णय घेतला आहे.