पावसाळ्यापूर्वीच्‍या नालेसफाईला एप्रिलपासून सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यापूर्वीच्‍या नालेसफाईला एप्रिलपासून सुरुवात
पावसाळ्यापूर्वीच्‍या नालेसफाईला एप्रिलपासून सुरुवात

पावसाळ्यापूर्वीच्‍या नालेसफाईला एप्रिलपासून सुरुवात

sakal_logo
By

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : यंदा पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई एप्रिल महिन्यातच सुरू करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. शहरात पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी सर्व महत्त्वाच्या नाल्यांची स्वच्छता योग्य पद्धतीने होणे गरजेचे असल्यामुळे नालेसफाईसाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यातच नालेसफाईच्या कामाला सुरुवात होणार आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या दहा तारखेच्या आसपास नालेसफाईला सुरुवात केली जाते. मात्र पाऊस लवकर आला तर नालेसफाईच्या कामात घाईगडबड होण्याची शक्यता आहे. यासाठी नालेसफाई एप्रिलमध्ये सुरू करण्याच्या सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार नालेसफाईचा कंत्राटदार नेमणुकीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर शहरात एकंदर १५५ छोटे-मोठे नाले आहेत. पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी त्याची पावसाळा सुरू होण्याआधी सफाई केली जाते.
-------------------------------------------------
अनिश्चित तरतूद
एप्रिल महिन्यात नालेसफाई होणार असल्यामुळे दहा जूनपर्यंत नालेसफाईसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यंदा अद्याप अर्थसंकल्प मंजूर झाला नसल्यामुळे नालेसफाईसाठी नेमकी किती तरतूद करण्यात येणार आहे, त्याचा आकडा निश्चित करण्यात आलेला नाही.

सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर्षी यासाठी चार कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मोठ्या नाल्यांसाठी हायड्रा, बोट, पोकलेन आदींचा वापर केला जाणार आहे.

नालेसफाईच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी नाल्यातील गाळाचे सफाई काम सुरू होण्याआधीचे आणि सफाई झाल्यानंतरचे चित्रीकरण केले जाणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्याठिकाणी कच्चे नालेदेखील खोदले जाणार आहेत.
--------------------------------------------------------
तिवरांच्‍या झाडांचा अडथळा
मिरा-भाईंदर शहरातील पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वाहून जाऊन अखेर खाडीला मिळते; परंतु अनेक ठिकाणी खाड्या या मातीचे भराव आणि झोपड्यांचे अतिक्रमण यामुळे अरुंद झाल्या आहेत. परिणामी या खाड्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच कमी झाली आहे. शिवाय काही ठिकाणी नाल्यांमध्ये तिवरांची झाडे वाढली असल्याने त्यात कचरा अडकून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असतो. यासाठी ज्याठिकाणी असे अडथळे दिसून येतील, त्या ठिकाणचे पंचनामे केले जाणार आहेत. तिवरांच्या वाळलेल्या व मृत झालेल्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी कांदळवन समितीकडे परवानगी मागण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली.
--------------------------------------
कोट
यंदा नालेसफाई वेळेवर व योग्य पद्धतीने होण्यासाठी ती एप्रिलमध्येच सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. नालेसफाईच्या कामावर आपण जातीने लक्ष देणार आहोत.
- दिलीप ढोले, आयुक्त, पालिका