
आदिवासी, नागरी संस्कृतीचे प्रतीक ‘मोखाड्याचा बोहाडा’
मोखाडा, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात होलिकोत्सवानंतर दुसऱ्या दिवसांपासून पुढील आठ दिवस जगदंबा उत्सव साजरा होतो. त्यालाच आदिवासी बोली भाषेत ‘बोहाडा’ साजरा करणे, असे म्हणतात. या उत्सवाला धूलिवंदनापासून सुरुवात झाली आहे. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी होतात. देव-देवतांचे मुखवटे घालून ते वाजंत्री आणि संबळच्या तालावर नाचवले जातात. या उत्सवाला सुमारे २५० हून अधिक वर्षांची परंपरा असून, आदिवासी नागरी संस्कृतीचे प्रतीक आणि परंपरा म्हणून हा ‘बोहाडा’ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
आदिवासींच्या परंपरागत देवता, रामायण, महाभारत, रामविजय, कृष्णविजय, विष्णुपुराण, पांडव प्रताप इत्यादी धार्मिक ग्रंथातील देवता या जगदंबा उत्सवात निवडल्या गेल्या आहेत. आदिवासी कलाकारांनी अप्रतिम हस्तकौशल्यातून उंबर, सागाच्या लाकडात कोरून, रेखीव देवदेवतांचे मुखवटे तयार केले आहेत. त्यावर आधुनिक रंग आणि कलाकुसर करून अधिक आकर्षक बनवले आहेत. त्यानंतर रुढी, परंपरेने विशिष्ट घराण्यांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले आहे. देवदेवतांचे मुखवटे घालून, पौराणिक आयुधे तसेच पोशाख करून वाजंत्री आणि संबळच्या तालावर लयबद्ध नृत्याचा उत्सव म्हणून ‘बोहाडा’ साजरा केला जातो. या उत्सवाला सुमारे २५० हून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. मुखवट्यांच्या ताफ्यामध्ये अनेक सोंगे २०० वर्षांपासूनची आहेत.
--------------------------------------
धामधूमीत उत्सवाला प्रारंभ
‘बोहाडा’ उत्सव एक प्रकारचा वसंतोत्सवच. फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अष्टमी असे आठ दिवस मोखाड्यात धामधुमीचे असतात. होलिकोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी धूलीवंदनालाच गणरायाच्या मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ झाला आहे. जगदंबा मंदिरासमोरील मंडपामध्ये गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आले आहे. द्वितीयेस मत्स्यावतार, तृतीयेस कूर्मावतार, चतुर्थीला वराह अवतार, पंचमीस भीम-हिडिंबा राक्षणीचा विवाह व भीम बकासुर युद्धाचा महाभारतातील प्रसंग, षष्ठीस लहान बोहाडा व सप्तमीला रात्री ८ ते अष्टमीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत असा रात्रभर मुख्य बोहाडा उत्सव.
------------------------------------------
जगदंबेची विजयी मिरवणूक
अष्टमीला सकाळी जगदंबेची भव्य महापूजा केली जाते. देवी-महिषासुर, शुंभ-निशुंभ यांच्या युद्धाचा थरारक प्रसंग साकारला जातो. त्यानंतर जगदंबेची विजयी मिरवणूक काढली जाते. यावेळी रस्त्यावर प्रत्येक घरासमोर सडा, रांगोळी काढली जाते. देवीच्या मिरवणुकीत फुले, अक्षता, कुरमुरे आणि लाह्या उधळल्या जातात. त्यानंतर कुस्त्यांचा जंगी फड भरतो. यामध्ये कुस्त्यांची दंगल पाहावयास मिळते. त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील मल्ल सहभागी होतात.
------------------------------------------------
सर्वधर्म समभाव
तालुक्यासह विविध भागातील आदिवासी वर्षभराचे कष्टाचे जीवन विसरून सहभागी होतो. महिला नटून-थटून मोखाड्यात लोंढ्याने मोखाड्यात येतात. आदिवासी महिला फुले, पाने, गजरे व पारंपरिक वेशभूषेत सजून येतात. या उत्सवाची महती आणि माहिती असणारे नागरिक, आदिवासी कला, संस्कृतीचे अभ्यासक, कलात्मक रसिक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. हिंदू व मुस्लिम बांधव, त्यांचे नातेवाईक, सासुरवाशिणी आपल्या मुला-बाळांसह माहेरी येतात. गुजराथी, जैन बांधवांचे महाराष्ट्र आणि गुजरातमधील नातेवाईकदेखील आवर्जून येतात.
----------------------------
ट्रस्टमार्फत लोकोपयोगी कामे
यात्रोत्सवात रोषणाई, मंडप, दिवट्यांसाठी तेल, पिण्याचे पाणी, लाईटची व्यवस्था, सोंगाचे मेकअप, वाजंत्री ताफे, जगदंबेची महापूजा याची सर्व व्यवस्था जगदंबा ट्रस्ट करते. लोकवर्गणी व जगदंबेपुढे भाविकांनी फेडलेल्या नवसाचे खण-नारळ, वस्त्र, सोन्या-चांदीचे वस्तू याचा लिलाव करून येणाऱ्या रकमेतून हा सर्व खर्च भागविला जातो. उर्वरित रकमेतून ट्रस्टमार्फत लोकोपयोगी कामे केली जातात.
---------------------------------
आर्थिक चक्र गतिमान
यात्रोत्सवात महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील रहाट पाळणे, खेळणी, मिठाई, फोटो, बासऱ्या, लाकडी खेळणी आणि कपड्यांची दुकाने यांसारखी दुकाने थाटली जातात. त्यामुळे स्थानिकांसह परगावच्या व्यापाऱ्यांना आठ दिवस रोजगार उपलब्ध होते. ग्राहकांनादेखील वेगवेगळ्या, नवनवीन वस्तू खरेदी करण्यास मिळतात. त्यामुळे मोखाड्यात आर्थिक चक्र गतिमान होते.