
रोह्यात जंगलात नेऊन गर्भवतीचा खून
रोहा, ता. ८ (बातमीदार) ः एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ७) रोहा तालुक्यातील वावेपोटगे येथे उघडकीस आली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही महिला सहा महिन्यांची गरोदर होती. पोटातील बाळासह तिचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा रोहा पोलिस शोध घेत आहेत.
रोहा-अलिबाग मार्गावरील यशवंतखारजवळील वावेपोटगे आणि डोंगरी गावादरम्यानच्या जंगलात या महिलेला मारून टाकण्यात आले होते. साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी या महिलेचा खून झाला असावा. या महिलेच्या उजव्या हाताच्या मनगटावर राजेश्वरी, तर हाताच्या अंगठ्यावर बीएस आणि करंगळीवर ओम अशी अक्षरे गोंदलेली आहेत. डाव्या हाताच्या मनगटाच्या खालील बाजूस एसआर अशी इंग्रजीत गोंदलेली अक्षरे आहेत, असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळावरच खड्डा खणून अंत्यसंस्कार करण्यात आले. होळी निमित्ताने लाकडे आणण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना कुजलेला मृतदेह दिसून आला. ही माहिती ग्रामस्थांनीच पोलिसांना दिली.
...
महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेच्या अंगावर लेगिज, पंजाबी कुर्ता असा पोशाख होता. पायातील एका पैंजणाव्यतिरिक्त तिच्या अंगावर दागिने नव्हते. नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर प्रकरणातील धागेदोरे मिळू शकतील.
- किरणकुमार सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा