मध्य रेल्वेचे महिला दिनी ‘लेडिज स्पेशल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेचे महिला दिनी ‘लेडिज स्पेशल’
मध्य रेल्वेचे महिला दिनी ‘लेडिज स्पेशल’

मध्य रेल्वेचे महिला दिनी ‘लेडिज स्पेशल’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : मध्य रेल्वेच्या सर्व विभागांत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त प्रशासनातर्फे ‘लेडिज स्पेशल’ लोकल चालवण्यात आली. या आगळ्यावेगळ्या लेडिज स्पेशलमध्ये मोटरमन, गार्ड, पोलिस आणि प्रवाशीही महिलाच होत्या. सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणसाठी सुटलेल्या या लेडिज स्पेशलने स्थानकांवरील प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.

अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चालवण्यात आलेल्या सीएसएमटी-कल्याण या लेडीज स्पेशल लोकलचे सारथ्य पहिली लोकल मोटरमन मुमताज काझी यांनी केले, तर गार्ड म्हणून मयुरी कांबळे यांनी काम पाहिले. तसेच मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचे सारथ्य देशातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी केले. तर सहाय्यक लोकोपायलट म्हणून सायली सावर्डेकर यांनी काम पाहिले. या एक्सप्रेसमध्ये ट्रेन व्यवस्थापक, तिकिट तपासणीस आदी सर्व कर्मचारी महिलाच होत्या.

पश्चिम रेल्वेवर योगाचे धडे
पश्चिम रेल्वेने आज महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना योगचे धडे दिले. लेडिज डब्यात महिला प्रशिक्षकांनी बसलेल्या सर्व प्रवासी महिलांना योगाचे महत्व पटवून दिले. तसेच गाडीत बसून योगा कसा करावा याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

आश्रित मुलींना शिलाई मशिन
मध्य रेल्वेने स्टाफ बेनिफिट फंडच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २० महिला रेल्वे कर्मचाऱ्यांना लेव्हल-१ प्रमाणपत्र आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ४ महिला आश्रित मुलींना ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत शिलाई मशीन देण्यात आली. तसेच रेल्वेमधील ‘महिला सक्षमीकरणासाठी कल्याणकारी उपाय’ या विषयावरील हँडबुक आणि स्टाफ बेनिफिट फंड योजनांवरील दोन पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आणि मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा शोभना लालवानी होत्या.