
लोककला सन्मानाने सेवा विवेकच्या महिला सन्मानित
विरार, ता. ८ (बातमीदार) : अखिल भारतीय महिला लोककला संमेलनामध्ये बुधवारी (ता. ८) सेवा विवेक सामजिक संस्थेचा सन्मान करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर येथे अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाला सुरुवात झाली आहे. या वेळी विविध क्षेत्रांत महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सेवा विवेक सामजिक संस्था पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी महिला सक्षमीकरणात काम करत आहे. आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. याच कामाची दखल घेत आंतरराष्ट्रीय महिला दिनी अखिल भारतीय महिला लोककला संमेलनामध्ये सेवा विवेक सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, डॉ. संध्या पुरेचा आणि अशोक घाडगे यांच्या उपस्थितीत सेवा विवेक सामजिक संस्थेकडून प्रगती भोईर यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले.