
मुंबई विमानतळावर ५४ कोटींचे हेरॉईन जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ८) केलेल्या कारवाईत दिल्लीतील एका ३० वर्षीय महिलेला अटक करून तिच्याकडून ५४ कोटी रुपयांच्या हेरॉईन जप्त करण्यात आले. लालरेंग पुई असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला झांबिया येथून भारतात हेरॉइन आणत होती. तिला अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तीन लाख रुपये मिळणार होते. याप्रकरणी दिल्लीतील एका परदेशी महिलेचा सहभाग असून तिने या महिलेचे विमानाचे तिकीट व परदेशात राहण्याची व्यवस्था केली होती. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी परदेशी महिलेचा शोध घेत आहेत. डीआरआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आफ्रिकेतील अदिस अबाबा येथून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. तिच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात सात किलो ६०० ग्रॅम संशयित पदार्थ सापडले. तपासणीत ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर बुधवारी या महिलेला अटक करण्यात आली.