मुंबईतून क्लीनअप मार्शल ‘आऊट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतून क्लीनअप मार्शल ‘आऊट’
मुंबईतून क्लीनअप मार्शल ‘आऊट’

मुंबईतून क्लीनअप मार्शल ‘आऊट’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ - मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणारे, अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी ‘क्लीन अप मार्शल’ची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र क्लीन अप मार्शलनी वसुलीचा धंदाच सुरू केल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने मुंबई महापालिकेने ‘क्लीन अप मार्शल’ कायमचे आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता क्लीन अप मार्शलऐवजी पाच हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती केली जाणार असून, स्वच्छता दूत दंडात्मक कारवाई करणार नसून फक्त जनजागृती करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये कोविड वॉरियर्सना पालिकेचे स्वच्छतादूत म्हणून सामावून घेण्यात येणार आहे.

रस्त्यांवर थुंकणारे, घाण करणारे, नाल्यात कचरा फेकणारे यांच्यावर नजर ठेवत दंडात्मक कारवाईसाठी क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले होते. मात्र काम कमी वसुली जादा म्हणून ‘वसुली मार्शल’ अशी क्लीन अप मार्शलची ओळख निर्माण झाली होती. क्लीन अप मार्शल पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या क्लीन अप मार्शलऐवजी ५ हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतून क्लीन अप मार्शलऐवजी आता स्वच्छता दूत दिसणार आहेत.

दहा स्वच्छता दुतांमागे एक पर्यवेक्षक!
५ हजार स्वच्छतादूत नेमण्यासह प्रत्येक १० स्वच्छतादूतांमागे १ पर्यवेक्षक नेमला जाणार आहे. हे स्वच्छतादूत क्लीनअप मार्शलप्रमाणे दंडात्मक कारवाई करणारे नसतील, तर ते प्रामुख्याने महानगरातील त्यांना नेमून दिलेल्या भागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन आदी बाबींवर देखरेख करणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी मदत करतील. स्वच्छतादूतांची कर्तव्ये, कामांच्या वेळा, मानधन आदींचा समावेश या धोरणात आहे.