
राज्य ॲथलेटिक्समध्ये ठाण्याला दोन सवर्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ या स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांसह ३ रौप्यपदके प्राप्त केली. १२ वर्षांखालील मुलींच्या गटात रिसा फर्नांडिसने ६० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्येही रौप्यपदक मिळवले. रिसा फर्नांडिस हिला ६० मीटरमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल १२ वर्षांखालील मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट ॲथलीट म्हणून घोषित करण्यात आले. वैयक्तिक चॅम्पियनशिप जिंकणारी ठाणे जिल्ह्यातील रिसा फर्नांडिस ही एकमेव खेळाडू आहे. त्याचबरोबर १२ वर्षांखालील मुलांच्या गटात अनिरुद्ध नंबुद्री याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक मिळवले. रिसा फर्नांडिस आणि नूपुर भट यांनी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक मिळवले.