
थंडगार कलिंगडाला ग्राहकांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते तसेच गारवादेखील मिळतो. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी वाढत असते. मुंबई-गोवा महामार्गावर सध्या रोहा, माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या कलिंगडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून चवदार कलिंगडांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
रोहा तालुक्यातील घोसाळे, सुतारवाडी या डोंगराळ भागासह कुंडलिका नदीच्या कालव्यावर किल्ला, कोलाड, तळघर या भागातील शेतीही कलिंगडाच्या लागवडीने बहरली आहे. याचबरोबर माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वालाच्या शेतीबरोबर तयार केलेले कलिंगडाचे पीक तयार झाले आहे. रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनीचे रोहा तालुका संघटक अजय लाटकर यांच्या मते रायगडमध्ये तयार होणाऱ्या कलिंगडाची चव गोड असते. रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने आरोग्यास हे फळ अधिक चांगले आहे. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असल्याने हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. तसेच जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ असल्याने कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या कलिंगडाला सध्या मागणी वाढली आहे.
------------------------------------------
सुशिक्षित तरुणाचा सहभाग
रायगड जिल्ह्यात पूर्वीपासूनच कलिंगडाची लागवड केली जात आहे. आता तर या व्यवसायात सुशिक्षित तरुण उतरले असल्याने रायगडमध्ये कलिंगडाचे उत्पादन वाढत चालले आहे. सध्या शुगरक्वीन जातीच्या कलिंगडांना सर्वाधिक मागणी आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी स्टॉल उभारून या कलिंगडांची विक्री केली जात आहे; तर किरकोळ बाजारात दर्जानुसार एक कलिंगड १०० ते १५० रुपयांपर्यंत मिळत आहे.
------------------------------------------
कलिंगड खाण्याचे फायदे
- रक्तदाब नियंत्रित करते
- शरीर हायड्रेटेड ठेवते
- शरीराला उष्णतेपासून वाचवण्यात मदत करते
- कलिंगडामुळे शरीर थंड राहते
- वेगाने वजन कमी होते
------------------------------------------------
घोसाळे येथे दोन एकर जागेत कलिंगडाची लागवड केलेली आहे. आतापर्यंत दीड टन पीक बाजारात विकले असून अडीच टन पीक विक्रीसाठी तयार आहे. सुरुवातीला १० रुपयांपेक्षा जास्त दर प्रतिकिलो मिळाला होता, सध्या कलिंगडाला मिळणारा दर कमी आहे. उन्हाळा जसजसा वाढेल, त्या प्रमाणात दर वाढत जाईल.
- नीतेश पाशिलकर, शेतकरी, घोसाळे