
महिलांना न्याय, समान हक्क द्या
विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : समाजातील सर्व स्तरांतील महिलांना ज्यावेळी समान न्याय व हक्क, तसेच दैनंदिन जीवनातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल, त्या वेळीच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल, असे प्रतिपादन पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विक्रमगड येथे केले. पालघर जिल्हा पोलिस दलातर्फे जनसंवाद अभियानांतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून विक्रमगड पोलिस कार्यालयामार्फत महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन व महिला कर्मचाऱ्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेले महिला विश्रांतीगृहाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, विक्रमगडचे नगराध्यक्ष नीलेश पडवळे, नगरसेवक निकेत पडवळे, जिजाऊच्या महिला सक्षमीकरण जिल्हा अध्यक्ष हेमांगी पाटील, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, भाजप प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, संजय आगीवले, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, विक्रमगडचे पोलिस अधिकारी प्रदीप गीते, उपनिरीक्षक सतीश जगताप, पोलिस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.