
वाड्यात क्रिसीव्ह इंडस्ट्रीज कंपनीला आग
वाडा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील उसर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या क्रिसिव्ह इंडस्ट्रीज या कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली आहे.
क्रिसिव्ह इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये वाहनांचे जुने टायर जाळून त्यापासून ऑईल तयार करण्याची प्रक्रिया केली जात आहे. आज दुपारच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वसई व भिवंडी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना पाचारण करण्यात आले; परंतु २५ ते ३० कि. मी. अंतरावरून अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत कंपनी जळून खाक झाली. वाड्यात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे उद्योग क्षेत्रातील मालकवर्ग धास्तावला असून वाड्यात स्वतंत्र अग्निशमन दल असावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.