एमआयडीसीतील दोन कंपन्या आगीत जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीतील दोन कंपन्या आगीत जळून खाक
एमआयडीसीतील दोन कंपन्या आगीत जळून खाक

एमआयडीसीतील दोन कंपन्या आगीत जळून खाक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः डोंबिवली एमआयडीसी फेज एकमधील रॅमसन्स आणि प्राज टेक्स्टाईल या दोन कंपन्यांना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कल्याण, ग्रामीण परिसरात आगीच्या ज्वाळांचे लोट दिसत होते. आगीमुळे कंपनीत काही प्रमाणात स्फोट होत होते. कंपनीच्या पाठीमागील बाजूस सीएनजी पेट्रोल पंप असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती समजताच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, तळोजा येथील अग्निशमन विभागांच्या सुमारे १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सकाळी आठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकतीच डोंबिवली एमआयडीसीमधील ड्रॅगर्स प्रा. लि. या कंपनीला रात्रीच्या वेळी आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर दावडी येथील भंगार गोदाम, गौसिया मार्केट येथील भंगार गोदामाला आणि अंबरनाथ येथील चारचाकी वाहनांच्या गॅरेजला आग लागल्याची घटना घडली होती. परिसरातील कारखाने, गोदामास फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात आग लागण्याच्या घटना घडत असल्याने या आगीतून संशयाचा धूर निघत आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात सुमारे १५० च्या आसपास रासायनिक कारखाने आहेत. प्रदूषणामुळे हे कारखाने येथून स्थलांतरित करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली होती.