महिलांच्या सवतलीचा एसटीला फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या सवतलीचा एसटीला फायदा
महिलांच्या सवतलीचा एसटीला फायदा

महिलांच्या सवतलीचा एसटीला फायदा

sakal_logo
By

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासांत सरसकट ५० टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली. महिलांसाठी करण्यात आलेल्या या घोषणेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या निर्णयामुळे एसटीच्या प्रवासीसंख्येत वाढ होण्यास मदत होईल; मात्र सवलतीचा परतावा सरकारकडून वेळेत द्यावा; अन्यथा एसटी अधिक गाळात जायला वेळ लागणार नाही, असा इशारा एसटीतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात एसटीसाठी इलेक्ट्रिक बसखरेदी आणि शंभरपेक्षा अधिक बसस्थानकांच्या पुनर्बांधणीची घोषणा केली. तसेच महिलांना तिकिटदरात ५० टक्के सवलत दिल्याने ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी लाभदायी ठरणार आहे. प्रवासी संख्या आणि महसुलात या निर्णयामुळे वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा आधीच कोसळला आहे. प्रवासी संख्येत घट होण्यासह उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत. त्यामुळे महिलांना प्रवास सवलतीचा निर्णय चांगला आहे; मात्र सरकारने या योजनेच्या पैशांचा परतावा एसटी महामंडळास वेळेत द्यावा, अशी मागणी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लाभार्थ्यांची संख्या दुप्पट होणार
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यात सवलत देते. अर्थसंकल्पात आज घोषणा केलेली ही सवलत ३० वी आहे. सध्या सवलत मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३८ कोटी आहे. महिलांच्या सवलतीमुळे लाभार्थ्यांची संख्या दुपट होणार असल्याचा अंदाज एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
----
अर्थसंकल्पातील घोषणेचे स्वागतच आहे; मात्र सवलतमूल्याची प्रतिपूर्ती वेळेवर व्हावी. तसेच एसटीतील सवलतींबाबत सर्व निर्णय सरकार घेत आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही वेतन देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
...
७५ वर्षांवरील नागरिकांच्या मोफत प्रवास योजनेपाठोपाठ महिलांना ५० टक्के सवलत देण्याची योजना स्वागतार्ह आहे; मात्र या सवलतीचा परतावा वेळेवर द्यावा. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नव्याने ५००० बसगाड्या खरेदी कराव्यात.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
...
महिलांना सवलत देण्याची घोषणा चांगली आहे; मात्र सलवतीच्या परताव्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात चकरा मारण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
...
महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे मुलींना शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.
- समिता पाटील, महिला प्रवासी