
पुढील दोन वर्षे हवेचा स्तर खालावलेलाच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पुढील किमान दोन वर्षे हवेचा स्तर खालावलेलाच राहणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘स्मॉग टॉवर’ या विषयावर शास्त्रज्ञ आणि काही तज्ज्ञ डॉक्टरांचे ऑनलाईन चर्चासत्र भरवण्यात आले होते. या चर्चासत्रात त्यांनी ‘स्मॉग टॉवर’ संकल्पनेचा हवा सुधारण्यासाठी जास्त फायदा होणार नाही, असे स्पष्ट मत मांडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत ‘अँटी स्मॉग टॉवर’ उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी त्याला अनुसरून अर्थसंकल्पातही तरतूद केली, पण स्मॉग टॉवर लावल्याने खरंच काही फरक पडणार का, हवेचा ढासळलेला स्तर सुधारेल का, तसेच घरांची घनता, राहण्याची व्यवस्था, रस्त्यांची घनता लक्षात घेता या स्मॉग टॉवरचा मुंबईसारख्या हवेचा दर्जा खालावलेल्या शहरात जास्त उपयोग होणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मुंबईत हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. तसेच प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. जसे बर्फाळलेल्या प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीला मेणबत्तीच्या साह्याने ऊब मिळू शकत नाही, तसेच मुंबईचे झाले आहे. वाढलेल्या प्रदूषणाचे प्रमाण ‘स्मॉग टॉवर’मुळे नियंत्रणात येणे कठीण आहे, असा मुद्दा ‘निरी’चे संशोधक डॉ. के. व्ही. जॉर्ज यांनी चर्चेत उपस्थित केला.
...तरच फायदा होईल
मोठ्या हॉलमध्ये जर स्मॉग टॉवर लावला किंवा बंद आणि खुल्या जागेत याचा वापर केल्यास थोड्या प्रमाणात उपयोग होऊ शकेल. तिथल्या प्रदूषणाची तीव्रता कमी होईल, पण प्रदूषणाच्या धुलिकणांवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही. स्मॉग टॉवर बसवण्यापेक्षा ग्रीन झोन वाढवणे, बांधकामांच्या ठिकाणावर लक्ष, वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्यास जिथे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे तिथे जास्त लक्ष दिल्यास त्याचा फायदा होईल, असे चर्चेदरम्यान शास्त्रज्ञ डॉ. हर्ष साळवे यांनी सांगितले.
हवेचे प्रदूषण दूर करण्यासाठी स्मॉग टॉवरचा वापर करणे ही अवास्तविक संकल्पना आहे. ही संकल्पना सुसंगत नसून पुढच्या दोन वर्षांत हवेच्या स्तरात काहीही बदल होणार नाही, तिचा स्तर कायम खालावलेलाच राहणार आहे.
- डॉ. अभिजीत चॅटर्जी, बोस संस्था, कोलकाता