महेश आहेर प्रकरणातून सरकारचा सर्वात मोठा पक्षपात दिसला : जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश आहेर प्रकरणातून सरकारचा सर्वात मोठा पक्षपात दिसला : जयंत पाटील
महेश आहेर प्रकरणातून सरकारचा सर्वात मोठा पक्षपात दिसला : जयंत पाटील

महेश आहेर प्रकरणातून सरकारचा सर्वात मोठा पक्षपात दिसला : जयंत पाटील

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : महेश आहेर यांच्यावर कारवाई होत नाही, यातूनच सरकारचा आजवरचा सर्वात मोठा पक्षपात दिसून आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ठामपातील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील हे मिलिंद पाटील यांच्या निवासस्थानी आले होते. या वेळेस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अभिजीत पवार यांच्या कार्यालयासही भेट दिली. या वेळी ते प्रसारमाध्यमा॔शी बोलत होते. विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण ठाण्यात वाढले आहे, याबाबत विचारले असता, जयंत पाटील म्हणाले की, ‘सत्तेचा गैरवापर किती करायचा, याच्या मर्यादा सध्याच्या महाराष्ट्र सरकारने सोडल्या आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. राज्य हातात आल्यानंतर ज्या यंत्रणा आहेत, त्यांचा गैरवापर सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत असून जनतेला हे मान्य नाही. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता यावर निकाल देईल. महेश आहेर यांच्याविरोधात प्रचंड पुरावे देण्यात आलेले आहेत.’ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना महेश आहेर यांच्यावर कारवाईसाठी आग्रही असतानाही कारवाई केली जात नाही, याबद्दल विचारले असता, यावरून तुम्हालाच समजत असेल, की सरकार किती पक्षपाती आहे, याचे सर्वात मोठे हेच उदाहरण आहे. अतिशय टोकाची पद्धत या सरकारने अंगीकारली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.