
मुंबईत शिवरायांचा जयघोष
मुंबई, ता. ११ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने मुंबईतील उपनगरांमध्ये चैतन्य पसरल्याचे अनुभवायला मिळाले. तिथीनुसार शिवरायांच्या जयंतीचा सोहळा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहानांपासून मोठ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कुर्ला-घाटकोपर मध्ये मिरवणूक
घाटकोपर (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कुर्ला आणि घाटकोपर येथे विविध कार्यक्रम राबवत साजरी झाली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने बंदोबस्ताच्या निमित्ताने हजर होते. घाटकोपर पूर्वे कडील राजावाडी भागातील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना शाखा क्रमांक १३२ येथे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, माजी शाखाप्रमुख सुदाम पाटील, कार्यालयप्रमुख कृष्णा चाळके, उपशाखाप्रमुख सचिन कासारे आदींनी महाराजांचे पूजन आणि वंदन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
कुर्ला भागात विविध मंडळांच्या वतीने हा सोहळा भव्य-दिव्य असा आयोजित करण्यात आला. या वेळी हजारो शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. कुर्ल्यातील या मिरवणूक आणि सोहळ्याचे आयोजन गणेश चिकणे (न्यू भारत क्रीडा मंडळ) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले होते. या मिरवणुकीत जवळपास चार हजार स्त्री-पुरुष आणि मुले सहभागी झाले होते. सायंकाळी सुरू झालेली ही मिरवणूक रात्री दहा वाजता समाप्त झाली. या वेळी खासदार पूनम महाजन, आमदार मंगेश कुडाळकर यांनी उपस्थिती लावली.
बाळगोपाळांचा उत्साह
मालाड (बातमीदार) ः कुरार व्हिलेज, दत्तवाडी येथे झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे तिथीप्रमाणे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाळ गोपाळांनी विशेष मेहनत घेतली. प्रमुख पाहुणे म्हणून दत्तवाडी विभागातील ज्येष्ठ नागरिक रमेश घाडी उपस्थित होते. शिवजयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. दत्तवाडीमधील सर्व नागरिकांनी सहकार्य केले, अशी माहिती प्रदीप भालेकर यांनी दिली.
ताडदेवमध्ये मर्दानी खेळ
वडाळा (बातमीदार) ः ताडदेवमध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी ढोल पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी, मर्दीनी खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शेकडो शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता; तर चिमुकल्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. ताडदेव गणेशोत्सव मंडळाकडून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, नेत्रदान, विविध आजारांवरील उपचार, गरीब विद्यार्थ्यांना मदत यासारखे उपक्रम घेतले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी दिली.
धारावीत मिठाईवाटप
धारावी (बातमीदार) : तिथीप्रमाणे साजऱ्या झालेल्या शिवजयंतीचा उत्साह धारावीत दिसून आला. शिवसेना (दोन्ही गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आदी प्रमुख राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्था-संघटना यांनी धारावीतील विविध विभागांत अनेक कार्यक्रम राबवून शिवजयंती उत्सव साजरा केला. काही पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. अनेक ठिकाणी नागरिकांना यानिमित्ताने मिठाई व पाण्याचे वाटप करण्यात आले होते.
चेंबूरमध्ये शिवरायांना मानवंदना
चेंबूर (बातमीदार) : चेंबूर, कुर्ला, विक्रोळी टिळकनगर परिसरात जय शिवाजी... जय भवानीचा जयघोष करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होण्याकरिता हजारो शिवप्रेमी पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आले होते. या वेळी विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना दिली. ढोल, ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध असे चित्र येथे दिसून आले.
‘आम्ही पुणेकर’ही सरसावले
कांदिवली (बातमीदार) ः चारकोप, सेक्टर पाच येथे ‘आम्ही पुणेकर’ रहिवासी सेवा संघातर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पहेराव डोक्यावर गांधी टोपी घालून सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कसार, सचिव अजित डोंगरे, खजिनदार अनंत बोंबले आणि कार्याध्यक्ष राजन शिंदे यांनी आलेल्या सर्व पुणेकरांना गांधी टोपी घालून सन्मानित केले. चारकोप गोराईमधील राजगुरूनगर, मावळ, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील ३०० कुटुंबीय सदस्य आसलेल्या आम्ही पुणेकरच्या वतीने अनेक सामजिक शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात. खासदार गोपाळ शेट्टी, माजी नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी शिवजयती उत्सवात सहभागी होऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुंबादेवीत शिवरायांची पालखी
मुंबादेवी (बातमीदार) : मुंबादेवी विधानसभा अंतर्गत विविध राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यात मोठे आकर्षण ठरले ते मनसेच्या कामाठीपुरा विभागातील शिवजयंती उत्सवाचे. मनसेचे विभाग अध्यक्ष केशव मुळे आणि उपाध्यक्ष विनोद अरगिले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत दोन सजविलेले अश्व, चार शिवकालीन वस्त्र परिधान केलेले मावळे, नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पेहराव्यात कलाकार आणि विभागीय नागरिक आणि मनसेचे सर्व पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले राजमुद्रा अंकित भगवे ध्वज शोभून दिसत होते. भरउन्हात निघालेल्या या पालखी मिरवणूक सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे, मनसे नेते शिरीष सावंत, रिटा गुप्ता, जिजा नांदगावकर, सुप्रिया दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये निरुत्साह
मालाड (बातमीदार) ः तिथीप्रमाणे शिवजयंती शिवसेनेच्या दोन्ही गटांनी साजरी केली; मात्र दोन्हीकडे उत्साह कमी होता. मालवणीत मागील चाळीस वर्षांपासून शिवजयंती साजरी होत आहे. मालवणीचे टोक म्हणजे अंबोजवाडी ते मालवणीचा प्रवेशद्वारापर्यंत निघणाऱ्या मिरवणुकीचा उत्साह आगळावेगळा असायचा; मात्र शिवसेनेत मोठी फूट पडल्याने मिरवणुकीत नेहमीचा उत्साह हरवल्याचे दिसून आले. दोन्ही गटांनी हाकेच्या अंतरावर आपले मंच उभारले होते; मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये विभाजनाचे दुःख आणि खंत चेहऱ्यावर दिसत होती.